मेडिकल चौकातील अतिक्रमण हटणार
By Admin | Updated: March 30, 2017 00:38 IST2017-03-30T00:38:37+5:302017-03-30T00:38:37+5:30
येथील मेडिकल चौकात अतिक्रमणधारक दुकानदारांना जागा खाली करून देण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागने दिले आहे.

मेडिकल चौकातील अतिक्रमण हटणार
सेवाग्राम : येथील मेडिकल चौकात अतिक्रमणधारक दुकानदारांना जागा खाली करून देण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागने दिले आहे. अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात येत असून त्यापूर्वी दुकानदारांनी सूचनेचे पालन करीत येथील दुकाने उचलायला सुरूवात केली. बुधवारी सकाळपासून चौकात लगबग पाहायला मिळाली. यावरुन येथील अतिक्रमण हटणार असल्याचे दिसते.
वर्धा-सेवाग्राम-समुद्रपूर या राज्य मार्गावर अतिक्रमण वाढत आहे. रहदारीच्या दृष्टीने हा महत्वाचा मार्ग आहे. सेवाग्राम मेडिकल चौकातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा दुकाने लावण्यात आली. या मार्गाचे काही प्रमाणात सौंदर्यीकरण करण्यात आले. रस्त्यालगत टपऱ्या लावून अनेकांनी उदरनिर्वाहाचे साधन निवडले. सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांनी वर्धा-सेवाग्राम-समुद्रपूर रस्त्यावर सेवाग्राम हद्दीत अतिक्रमण केल्याच्या कारणावरून दुकानधारकांना नोटीस दिल्या. हे अतिक्रमण २९ मार्चपर्यंत खाली करायचे होते. बांधकाम विभागाकडून होणाऱ्या कारवाईत सामान ताब्यात घेऊन कारवाईचा खर्च दुकानदारांकडून वसूल करण्यात येणार होता. त्यामुळे येथील दुकानदारांनी ही जागा खाली करण्याचा सपाटा लावला आहे. वर्धा-समुद्रपूर, वर्धा-कांढळी आणि सेवाग्राम पवनार या मार्गाचे रूंदीकरण होणार असल्याची चर्चा आहे. सेवाग्राम हे पर्यटन केंद्र असल्याने सौंदर्यीकरणावर भर देण्यात येणार असल्याने अतिक्रमण हटविण्यात येत आहे.(वार्ताहर)