मुख्य रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा
By Admin | Updated: May 7, 2017 00:41 IST2017-05-07T00:41:23+5:302017-05-07T00:41:23+5:30
नगर पंचायत प्रशासनाने दाभा रोडवरील व तहसील परिसरातील अतिक्रमण मोठ्या साहसाने व तत्परतेने हटविले.

मुख्य रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा
पादचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात : रस्ता मोकळा करण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : नगर पंचायत प्रशासनाने दाभा रोडवरील व तहसील परिसरातील अतिक्रमण मोठ्या साहसाने व तत्परतेने हटविले. या महत्त्वाच्या कार्याबाबत नागरिकांनी प्रशासनाचे कौतुकही केले; पण नागरिक शहरातील मुख्य सिमेंट रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणामुळे त्रस्त आहे. हे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करणे गरजेचे झाले आहे.
या मार्गावर ग्राहकांना वाहन ठेवायला तर सोडा उभे राहायलाही जागा नाही. एखादी दुचाकी वा चारचाकी कधी अंगावार येईल, हे सांगता येत नाही. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांना जीव मुठीत घेऊन ये-ज करावी लागते. ग्रा.पं. ने बांधलेल्या व्यापार संकुलामध्ये तर अतिक्रमणाने कळस गाठला आहे. येथील दुकानदार दुकानातील अधिकाधिक वस्तू दुकानासमोर मुख्य रस्त्यापर्यंत मांडतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. ग्राहकांना वाहने ठेवण्यास जागा नसते. नगर पंचायत प्रशासनाने या अतिक्रमाकडे त्वरित लक्ष देत कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
शहरात एकच मुख्य सिमेंट रस्ता आहे. या रस्त्याच्या दुतर्फा बाजारपेठ आहे. काही स्थायी आणि काही अस्थायी स्वरूपाची दुकाने आहेत. काही स्थायी दुकानदारांनी आपल्या मालकीच्या हक्काचे जागेएवढीच अधिकची जागा अतिक्रमण म्हणून बळकावली आहे. आणखी जागा कशी बळकावता येईल, याचा योजनाबद्ध प्रयत्न सुरू आहे. प्रथम टिनाचे शेड, नंतर विटाचे बांधकाम, नंतर निवडणुकीचा काळ पाहून कायम सिमेंटचे बांधकाम केले आहे. एवढ्यावरच न थांबता आता, दुकानाचा बोर्ड आणि साहित्य रस्त्यावर मांडण्यास प्रारंभ केला आहे. या प्रकारामुळे रस्ता मात्र निमूळता होत आहे. वाहतुक असुरक्षित झाली असून पादचाऱ्यांना चालतानाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे अतिक्रमण दररोज येजा-जाता नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीस पडते; पण राजकीय गणित कोण बिघडवून घेणार, या भीतीपोटी ते हटविण्यास कुणीही तयार नाही, हे वास्तव आहे. याची झळ मात्र सामान्य नागरिकांना सोसावी लागत आहे. सामान्यांची वाहतूक व जीव या रस्त्याने रहदारी कताना धोक्यात आले आहे. अतिक्रमणामुळे अनेक अपघात झाले असून अनेकांना जखमी व्हावे लागले आहे.
भाजीपाला व फळ विक्रीसाठी ग्रामपंचायतने नवीन बाजारात लाखो रुपये खर्च करून मोठ-मोठे ओटे बांधून ठेवले आहेत. या ओट्यांवर भाजीपाला आणि फळविक्रीची दुाकने मांडली तर रस्त्यावरील अस्थायी अतिक्रमण हटून रस्त्यावरील गर्दी कमी होऊ शकते. शिवाय एकाच ठिकाणी भाजीपाला व फळे विकत घेणे ग्राहकांनाही सोयीचे होऊ शकते; पण हे करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याने असंतोष पसरला आहे.
शहरातील मुख्य सिमेंट रस्त्यावर झालेल्या या अतिक्रमणाकडे नगर पंचायतच्या प्रशासकीय अधिकारी तथा पदाधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देत कार्यवाही करावी. रस्ता खुला करून सामान्य नागरिकांची वाहतूक सुरक्षित करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.