ताराचे कुंपण करीत शेतावर अतिक्रमण
By Admin | Updated: July 31, 2016 00:47 IST2016-07-31T00:47:02+5:302016-07-31T00:47:02+5:30
शेतकऱ्याच्या शेतात २०१२ मध्ये खांब रोवून जानेवारी, फेबु्रवारी २०१६ मध्ये तारांचे कुंपण करण्यात आले.

ताराचे कुंपण करीत शेतावर अतिक्रमण
वनविभागाचा प्रताप : लोकशाही दिनातील तक्रारींकडेही कानाडोळा
वर्धा : शेतकऱ्याच्या शेतात २०१२ मध्ये खांब रोवून जानेवारी, फेबु्रवारी २०१६ मध्ये तारांचे कुंपण करण्यात आले. तत्पूर्वी शेतकऱ्याने शेतात अतिक्रमण केल्याबाबत तक्रार करूनही न्याय देण्यात आला नाही. या प्रकारामुळे शेतकऱ्याचे शेत कमी झाले असून कामे करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत लोकशाही दिनात तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. याकडे लक्ष देत न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
सेलू तालुक्यातील सोनेगाव येथे सर्व्हे क्र. ४ मध्ये मनोहर मारुती मुडे यांचे शेत आहे. या शेताला लागून वन विभागाच्या हिंगणी वनपरिक्षेत्राची (फॉरेस्ट) सर्व्हे क्र. एक मध्ये जागा आहे. मुडे यांच्या शेताची तसेच वन विभागाच्या जमिनीची १९८०-८१ मध्ये मोजणी करण्यात आली होती. त्यानुसार आखणीही करून देण्यात आली होती. असे असताना २०१२ मध्ये हिंगणी वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी मुडे यांच्या शेतात चार ते पाच फुटाचे सिमेंट खांब रोवले. यामुळे शेतकऱ्याने वन परिक्षेत्र कार्यालय हिंगणी यांच्याकडे प्रथम १० आॅक्टोबर २०१२, १४ डिसेंबर २०१२ व ४ डिसेंबर २०१५ असे तीन वेळा अर्ज केले. शेताचे संपूर्ण कागदपत्र जोडले; पण वरिष्ठांनी कुठलीही कार्यवाही न करता जानेवारी -फेब्रुवारी २०१६ मध्ये शेतातच अतिक्रमण करून तारेचे कुंपण घातले. परिणामी, मुडे यांचे शेत कमी झाले. शिवाय त्यांना शेतातील कामे करतानाही प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हा अन्याय दूर करावा म्हणून वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. लोकशाही दिनातही तक्रार केली; पण अद्याप कार्यवाही झाली नाही. याकडे लक्ष देत न्यायाची मागणी शेतकऱ्याने केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
दोन्ही विभागाची मोजणी ठरली निरर्थक
सोनेगाव येथील शेत सर्व्हे क्र. ४ मध्ये मनोहर मारूती मुडे यांचे २.०१ हेक्टर आर शेतजमीन आहे. या जमिनीवर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण करून तारांचे कुंपण घातले. परिणामी, शेतकऱ्याची जमीन कमी झाली असून शेतातील कामे करतानाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. वास्तविक, १९८०-८१ मध्ये वन विभागाकडूनच मोजणी करून हद्द निश्चित करण्यात आली होती.
४यानंतर शेतकरी मुडे यांनीही ४ आॅगस्ट २०१० रोजी भूमि अभिलेख कार्यालयात तीन हजार रुपये भरून मोजणी करून घेतली होती. यातही वन विभागाची जागा आणि शेताची हद्द कायम करून देण्यात आली होती. असे असले तरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही मोजण्या निरर्थक ठरवित शेतामध्ये अतिक्रमण करून तारांचे कुंपण करीत शेतकऱ्यावर अन्याय केला आहे.
१६ वर्षांपासून शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत
शेतकऱ्याने २०१० मध्ये पैसे खर्च करून शेताची मोजणी करून घेतली. यानंतर वन विभागाची जमीन आणि शेतजमिनीची हद्द कायम करण्यात आली. असे असताना २०१२ मध्ये सिमेंट खांब रोवण्यात आले तर यावर्षी तारांचे कुंपण करण्यात आले. २०१२ पासून शेतकरी मनोहर मुडे न्यायासाठी लढत आहेत; पण त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. पूर्वी खांबांमुळे शेतातील कामे करता येत नव्हती तर आता तारांचे कुंपण करून जमिनीच बळकावण्यात आली. शासन, प्रशासनच शेतकऱ्यांवर अन्याय करीत असेल तर त्यांनी न्याय कुणाकडे मागावा, अशीच स्थिती निर्माण झाली आहे. २०१० पासून सुरू असलेल्या या प्रकरणात अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही.