शासकीय आबादीच्या जागेवर शेतकऱ्याचे अतिक्रमण

By Admin | Updated: June 22, 2015 01:53 IST2015-06-22T01:53:31+5:302015-06-22T01:53:31+5:30

गावाबाहेरील हनूमान मंदिराच्या मागील परिसरात शासकीय आबादी जमिनीवर दोन वर्षांपासून एका शेतकऱ्याने अतिक्रमण करीत अवैधरित्या कब्जा केला आहे.

The encroachment of the farmer at the place of government population | शासकीय आबादीच्या जागेवर शेतकऱ्याचे अतिक्रमण

शासकीय आबादीच्या जागेवर शेतकऱ्याचे अतिक्रमण

सहा महिन्यांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष : चार शेतकऱ्यांची वहिवाट झाली बंद; कारवाई करण्यास चालढकल
कारंजा (घा.) : गावाबाहेरील हनूमान मंदिराच्या मागील परिसरात शासकीय आबादी जमिनीवर दोन वर्षांपासून एका शेतकऱ्याने अतिक्रमण करीत अवैधरित्या कब्जा केला आहे. या जमिनीवर पेरणी करून सदर शेतकरी मालकी हक्क गाजवित आहे. एवढेच नव्हे तर भोवतालच्या चार शेतकऱ्यांची शेतात जाण्याची वहिवाटच बंद केली आहे. यामुळे त्या शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली आहेत. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या अतिक्रमणामुळे मारोती नामदेव कदमधाड सर्व्हे क्र. १०३१, १०३०, १०२१, भाऊराव डोमाजी बेलखेडे सर्व्हे क्र. १०२६, गणपत नत्थूजी सरोदे सर्व्हे क्र. १०२५ व किशोर भाऊराव मुकदम सर्व्हे क्र. १०२२ हे शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यांची शेताची वहिवाट बंद झाल्याने शेतातील कामे खोळंबली आहेत. यामुळे शासकीय आबादी जागेवरील अतिक्रमण काढावे व वहिवाटीचा रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी ३० डिसेंबर २०१४, १४ जानेवारी व ४ फेबु्रवारी २०१५ रोजी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पंचायत समिती, जिल्हाधिकारी यांना तक्रार सादर केली. ७ फेबु्रवारी रोजी विभागीय आयुक्तांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्वरित चौकशी करून अहवाल सादर करा व शेतकऱ्यांना कळवा, असे पत्र दिले; पण कार्यालयाने या पत्राला केराची टोपली दाखवित अतिक्रणधारकास पाठीशी घातले.
गुरूवारी त्रस्त शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार गणेश बर्वे व तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांना भेटून कैफियत मांडली. संबंधित शेतकऱ्याला पेरणी करण्यापासून अटकाव करावा, अशी मागणी केली. यावर बर्वे यांनी सदर शेतकरी पेरणी करणार नाही. मी त्याला तसे पत्र देतो, असे सांगितले; पण शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या रमेश पांडुरंग सरोदे या शेतकऱ्याने शुक्रवारी पेरणी सुरू करून अरेरावीचा प्रत्यय दिला. पेरणी झाल्यानंतर शेतात जाता येणार नाही व गेल्यास अतिक्रमणधारक वाद घालेल, या भीतीने शुक्रवारी चारही शेतकऱ्यांनी गैरअर्जदार पेरणी करीत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना कळविले. यावर तहसीलदार बालपांडे यांनी अतिक्रणधारक शेतकरी रमेश सरोदे यांनी पेरणी करू नये, असे पत्र दिले आहे. यावरही त्याने पेरणी केली तर फौजदारी गुन्हा दाखल करू, अशी ग्वाही दिली; पण अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत आबादी जमिनीवरील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
विभागीय आयुक्तांच्या आदेशालाही केराची टोपली
वहिवाट बंद झालेल्या चार शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. यावरून अतिक्रमण हटविण्याचे आदेश देण्यात आले होते; पण या आदेशालाही केराची टोपली दाखविण्यात आली. एक वर्षापासून कारवाई करण्यास टाळाटाळ करणारे तहसीलदार खरोखरच कारवाई करणार काय, शासकीय जमीन ताब्यात घेतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
२१ मे रोजी मंडळ अधिकाऱ्याने जागेची पाहणी करून सरोदे यांनी जेसीबीद्वारे आबादी जमीन उठीत केल्याचे अहवालात नमूद केले आहे; पण तहसीलदार बालपांडे यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
आबादी जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यास पेरणी न करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. यानंतरही शेतकऱ्याने पेरणी केली तर त्याच्या विरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
- गजेंद्र बालपांडे, तहसीलदार, कारंजा (घा.).

Web Title: The encroachment of the farmer at the place of government population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.