विविध मागण्यांसाठी अपंगांचे शिक्षणाधिकाऱ्यांना साकडे
By Admin | Updated: September 24, 2014 23:40 IST2014-09-24T23:40:26+5:302014-09-24T23:40:26+5:30
महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त अपंग कर्मचारी व अधिकारी संघटना यांनी विविध मागण्यांचे निवेदन जि. प. शिक्षणाधिकारी रवीन्द्र काटोलकर यांना सादर केले. यात प्रामुख्याने अपंग कर्मचाऱ्यांच्या बदल्या,

विविध मागण्यांसाठी अपंगांचे शिक्षणाधिकाऱ्यांना साकडे
वर्धा : महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त अपंग कर्मचारी व अधिकारी संघटना यांनी विविध मागण्यांचे निवेदन जि. प. शिक्षणाधिकारी रवीन्द्र काटोलकर यांना सादर केले. यात प्रामुख्याने अपंग कर्मचाऱ्यांच्या बदल्या, समायोजन अथवा पदस्थापना आदी मागण्यांचा समावेश आहे. यासह अपंग कर्मचाऱ्यांकरिता स्वतंत्र विभाग आणि सेवाज्येष्ठतेनुसार यादी तयार करण्याची मागणी केली.
यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने काटोलकर यांची भेट घेऊन विविध मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी पदग्रहणानिमित्त काटोलकर यांचा सत्कार करण्यात आला. या निवेदनानुसार, शासन निर्णयानुसार अपंग कर्मचाऱ्यांची बदली, समायोजन अथवा पदस्थापना यासारख्या स्थानांतरण प्रक्रियेतून पूर्णत: वगळणे याबाबत चर्चा केली. यासह सामान्य प्रशासन विभागाचे पत्र क्र. ई.एस.टी. २६ मार्च १९९७ नुसार अपंग कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामात कर्तव्यावर न लावणे याचाही उल्लेख करण्यात आला. अपंग कर्मचाऱ्यांची स्वतंत्र विभाग व प्रवर्गवार सेवाज्येष्ठता यादी तयार करावी. यामुळे प्रशासकीय गोंधळ टळेल. तसेच ही यादी तयार करुन त्याची प्रत संघटनेला देण्याची मागणी करण्यात आली. यासह ७ फेब्रुवारी १९९६ पासून परिगणना करून तात्काळ अपंगाचा अनुशेष भरण्यात यावा, जिल्ह्यातील ज्या विभागात दोन उच्चश्रेणी मुख्याध्यापक कार्यरत आहेत तेथील शैक्षणिक कार्र्याविषयक बऱ्याच समस्या उत्पन्न झाल्या असून याची तातडीने चौकशी निर्णय घेण्यात यावा. पदोन्नत व पदावनत झालेल्या पदवीधर शिक्षकांबाबत त्वरित निर्णय घेतला जावा. भरारी पथकाच्या माध्यमातून शिक्षकांच्या मनात दहशत निर्माण होईल असे कृत्य टाळावे आदी मागण्यांचा यात सहभाग होता. या मागण्यांचा आढावा घेऊन निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले. शिष्टमंडळात जिल्हा अध्यक्ष संजय वाढवे, सचिव प्रवीण हाडे, कोषाध्यक्ष संतोष चांदेकर, सुनील नन्होरे, रवी सारसर, उपाध्यक्ष संदीप ढाले, गजानन धानकुटे व पदाधिकारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)