रिकामे भूखंड ठरतात डोकेदुखी
By Admin | Updated: October 21, 2016 02:02 IST2016-10-21T02:02:34+5:302016-10-21T02:02:34+5:30
नागरिकांकडून प्रॉपर्टी असावी म्हणून अनेक ठिकाणी भूखंडांची खरेदी करून ठेवली जाते; पण त्यांचा वापर कुठल्याही कामासाठी केला जात नाही.

रिकामे भूखंड ठरतात डोकेदुखी
प्रशासनाचे दुर्लक्ष : अस्वच्छता, कचऱ्यामुळे दुर्गंधी, नागरिक त्रस्त
वर्धा : नागरिकांकडून प्रॉपर्टी असावी म्हणून अनेक ठिकाणी भूखंडांची खरेदी करून ठेवली जाते; पण त्यांचा वापर कुठल्याही कामासाठी केला जात नाही. असे भूखंड कचरा, घाणीने माखत असल्याने ते डोकेदुखी ठरत असल्याचेच दिसून येत आहे. संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शहरात अनेक नागरिकांनी प्रॉपर्टी म्हणून भूखंडांची खरेदी करून ठेवली आहे. अनेक भूखंडांवर घरांचे बांधकाम झाले तर बहुतांश भूखंड रिक्त आहेत. या रिक्त भूखंडांवर सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. वर्धा शहरात रामनगर, आर्वी नाका परिसर, साईनगर, दयालनगर, इतवारा बाजार परिसर यासह अनेक भागांमध्ये हा प्रकार पाहावयास मिळतो. रिकाम्या भूखंडांवर परिसरातील नागरिक कचरा टाकत असल्याने तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण होते. यातूनच डासांचा प्रादुर्भाव वाढत असून विविध आजारांचा फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. रिकामे भूखंड वा अर्धवट बांधकामे अनैतिक कृत्यांचे अड्डेही बनल्याचे दिसून येत आहे.
हा प्रकार केवळ शहरातच आहे, असे नव्हे तर शहरालगतच्या ग्रामीण भागातही पाहावयास मिळतो. सर्वच ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये रिकामे भूखंड दिसून येत असून त्यावर कचऱ्याचे साम्राज्यही पसरलेले आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात; पण स्थानिक स्वराज्य संस्था त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेच दिसून येत आहे. परिणामी, नागरिकांना दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव पर्यायाने विविध आजारांचा सामना करावा लागतो. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)