लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : झोपडपट्टीतील मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या फुटपाथ स्कूलच्या गरीब विद्यार्थ्यांकडून लॉकडाऊनच्या काळातही आपापल्या परीने कुटुंबाला मदत करीत असल्याचे चित्र आहे.शहरातील आर्वी नाका परिसरात युवा सामाजिक कार्यकर्ते मोहित सहारे मागील कित्येक वर्षांपासून फुटपाथ स्कूल चालवितात. ज्यांची परिस्थिती मुलांना शिकविण्यासारखी नाही, अशा कुटुंबातील भटकणाऱ्या मुलांना या शाळेत प्रवेश दिला जातो. येथे मुलांना प्राथमिक शिक्षण दिले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या असलेल्या लॉकडाऊनसह संचारबंदीमुळे या शाळेत उपक्रम राबविणे बंद आहे. त्यामुळे मुले आपापल्या झोपड्यांकडे पांगली आहेत.ज्या कुटुंबात आई-वडिलांच्या परिश्रमावरच उपजीविका चालते, अशा कुटुंबांचा रोजगार आता हरविला गेला आहे. या कुटुंबांना स्वयंसेवी संस्थांनी अन्नधान्य स्वरूपात मदतीचा हात दिला. मात्र, रोख रक्कम हाती नसल्याने या कुटुंबांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशाच एका कुटुंबातील एक दहा वर्षाचा मुलगा नागेश हातगाडीच्या माध्यमातून विविध भागात फिरून फळविक्री करीत कुटुंबाला हातभार लावत आहे. वडिलांचा लस्सीचा व्यवसाय लॉकडाऊनमुळे ठप्प आहे. तळपत्या उन्हात दुपारपर्यंत ही फळे विकून मिळकतीची रक्कम तो आईकडे सुपूर्द करतो. परिस्थितीची दाहकता शिक्षक मोहित सहारे यांनी निदर्शनास आणून दिली. त्याचबरोबर इतर दोन मुले झोपडपट्टी परिसरातच भाजीपाला विकतात. समाजातील या वंचित घटकांच्या मदतीसाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा सहारे यांनी व्यक्त केली. फूटपाथ स्कूलची उर्वरित मुले घरीच कुटुंबाला मदत करीत आहेत. त्यांच्या या शाळेला मान्यता नाही. पण किमान मुळाक्षरे गिरवून तरी या मुलांना वाचता यायला हवे, हा या शाळेचा प्रामाणिक हेतू आहे.
फूटपाथ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शोधल्या रोजगारवाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST
शहरातील आर्वी नाका परिसरात युवा सामाजिक कार्यकर्ते मोहित सहारे मागील कित्येक वर्षांपासून फुटपाथ स्कूल चालवितात. ज्यांची परिस्थिती मुलांना शिकविण्यासारखी नाही, अशा कुटुंबातील भटकणाऱ्या मुलांना या शाळेत प्रवेश दिला जातो. येथे मुलांना प्राथमिक शिक्षण दिले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या असलेल्या लॉकडाऊनसह संचारबंदीमुळे या शाळेत उपक्रम राबविणे बंद आहे. त्यामुळे मुले आपापल्या झोपड्यांकडे पांगली आहेत.
फूटपाथ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शोधल्या रोजगारवाटा
ठळक मुद्देकुटुंबाला लावताहेत हातभार : कुणी विकतो फळे, कुणी विकतो भाजीपाला