कर्मचारी, कामगारांचे वेतन थकित
By Admin | Updated: December 23, 2014 23:10 IST2014-12-23T23:10:05+5:302014-12-23T23:10:05+5:30
भारतीय सफाई मजदूर संघ आर्वीद्वारे २८ नोव्हेंबर रोजी नेवारे, पंड्या, कायस्थ यांच्या पदोन्नती तसेच थकित वेतनाबाबत नगराध्यक्षांसह जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते़

कर्मचारी, कामगारांचे वेतन थकित
वर्धा : भारतीय सफाई मजदूर संघ आर्वीद्वारे २८ नोव्हेंबर रोजी नेवारे, पंड्या, कायस्थ यांच्या पदोन्नती तसेच थकित वेतनाबाबत नगराध्यक्षांसह जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते़ यावेळी १५ दिवसांत समस्या निकाली काढण्याची हमी देण्यात आली होती; पण अद्यापही समस्यांवर तोडगा काढण्यात आलेला नाही़ यामुळे पदोन्नतीचे प्रलंबित अर्ज निकाली काढावेत, अशी मागणी ऩप़ कर्मचारी संघटनेने केली आहे़
भारतीय सफाई मजदूर संघ आर्वी तसेच ऩप़ कर्मचारी संघटनेद्वारे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत प्रलंबित अर्ज निकाली काढण्याची मागणी करण्यात आली होती़ शासन उद्दीष्टानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचे मासिक वेतन देणे गरजेचे आहे; पण तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकित आहे़ शासन स्तरावर याबाबत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही़ २५ आॅक्टोबर रोजी शासन निर्णयाप्रमाणे १३ व्या वित्त आयोगातून सेवानिवृत्त कर्मचारी, ऩप़ कर्मचारी तसेच सफाई कामगारांना वेतन देता येते़ सदर अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत़ असे असताना आर्वी नगर परिदषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केले नाहीत़ यामुळे ऩप़ कर्मचारी, सफाई कामगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे़
यामुळे नगर परिषद प्रशासन आर्वी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कर्मचारी, कामगारांचे वेतन त्वरित अदा करावेत, अशी मागणी सफाई कामगार संघ व ऩप़ कर्मचारी संघटनेने केली आहे़ अन्यथा लेखणीबंद आंदोलन करण्यात येईल तसेच सफाई कामगारही संपावर जातील, असा इशारा निवेदनातून दिला आहे़(कार्यालय प्रतिनिधी)