विविध मागण्यांकरिता कर्मचाऱ्याची वीरुगिरी
By Admin | Updated: December 13, 2014 02:03 IST2014-12-13T02:03:50+5:302014-12-13T02:03:50+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे इलेक्ट्रीशिएन अनंता साटोणे यांनी छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधील पाण्याच्या टाकीवर चढून ...

विविध मागण्यांकरिता कर्मचाऱ्याची वीरुगिरी
हिंगणघाट : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे इलेक्ट्रीशिएन अनंता साटोणे यांनी छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधील पाण्याच्या टाकीवर चढून विष प्राशन करण्याची धमकी देत प्रलंबित मागण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून विरूगिरी आंदोलन सुरू केले. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास सहकारी संस्था सहाय्यक निबंधक एकनाथ मुन यांनी वरिष्ठांशी चर्चा करून १५ डिसेंबर २०१४ रोजी पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा घडवून आणण्याच्या लेखी आश्वासनावर साटोणे यांनी आंदोलन मागे घेतले.
अनंता साटोणे (४५) रा. संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट हे गत १५ वर्षांपासून समितीत इलेक्ट्रीशिएन पदावर कार्यरत असून दोनदा निलंबित झाले. त्यांनी विविध मागण्यासाठी यापूर्वी बेमुदत उपोषणही केले. यात त्यांनी निलंबित कालावधीचे वेतन मिळणे, सानुग्रह अनुदान मिळेण, निलंबित काळातील वेतनवाढ मिळेण, स्थायी नियुक्ती पाचव्या वेतन आयोगाची थकबाकी सहाव्या वेतन आयोगाची शिफारस लागू करणे यासह अनेक मागण्या केल्या आहेत. या सर्व मागण्या तातडीने पूर्ण व्हाव्यात अन्यथा १२ डिसेंबर २०१४ ला त्यांनी देह त्यागचा इशारा दिला होता.
यामुळे सर्वत्र पोलीस बंदोबस्त असतानाही मार्केटच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून साटोणे यांनी विष प्राशन करण्याची धमकी देत आंदोलन केले. त्यांच्या जवळ विषाची बाटली असल्याचे कळते. समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यवतमाळ येथे असल्याने उपसभापती हरिश वडतकर यांनी चर्चा करून तडजोडीचा प्रयत्न केला.(तालुका प्रतिनिधी)