पंचायत समिती कार्यालयात कर्मचाऱ्यांची ‘लेटलतिफी’
By Admin | Updated: July 12, 2014 23:51 IST2014-07-12T23:51:13+5:302014-07-12T23:51:13+5:30
शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची लेटलतिफी नित्याचीच बाब झाली आहे़ शुक्रवारी सकाळी १० वाजून १० मिनीटांनी सेलू पंचायत समिती कार्यालयास भेट दिली असता कुणीही आढळून आले नाही़

पंचायत समिती कार्यालयात कर्मचाऱ्यांची ‘लेटलतिफी’
घोराड : शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची लेटलतिफी नित्याचीच बाब झाली आहे़ शुक्रवारी सकाळी १० वाजून १० मिनीटांनी सेलू पंचायत समिती कार्यालयास भेट दिली असता कुणीही आढळून आले नाही़ अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहण्याच्या शासनाच्या आदेशाला हरताळच फासत असल्याचे यातून दिसून आले़
परिसरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात केवळ शिपाई उपस्थित होता़ पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालय, बांधकाम विभाग या कार्यालयाचे कुलूप उघडले होते; पण दार बंदच होते़ पंचायत समिती कार्यालयाच्या लेखा विभागात व पंचायत विभागात कुणीही उपस्थित नव्हते़ कृषी व आस्थापना विभागात तुरळक कर्मचारी उपस्थित होते़़ गटविकास अधिकारी उपस्थित नव्हते तर सहायक गटविकास अधिकारी उपस्थित होते़ यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची लेटलतिफी समोर आली़ शिक्षण व आरोग्य विस्तार अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती नगण्य आढळून आली़
कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, असा आदेश असला तरी वर्र्धा येथूनच बहुतांश कर्मचारी ये-जा करतात़ पंचायत समिती परिसर हा विस्तीर्ण असताना येथे असलेली कर्मचाऱ्यांची निवासस्थाने पूर्णत: मोडकळीस आली आहेत़ काही निवासस्थानांवरून काही विभागाच्या कार्यालयाचा कारभार चालविला जात आहे़ सभापतीच्या निवासस्थानातून एका विभागाचा कारभार पाहिला जातो़ कर्मचारी उशीरा येत असल्याने नागरिकांना आपल्या कामांसाठी ताटकळावे लागते़ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)