तूर खरेदीच्या शासकीय केंद्रांवर कर्मचाऱ्यांची बोंब
By Admin | Updated: February 26, 2017 00:49 IST2017-02-26T00:49:15+5:302017-02-26T00:49:15+5:30
तुरीचे दर पडल्याने शासनाने नाफेड आणि भारतीय खाद्य निगमच्या माध्यमातून शासकीय दरात तूर खरेदीचा निर्णय घेतला.

तूर खरेदीच्या शासकीय केंद्रांवर कर्मचाऱ्यांची बोंब
शेतकऱ्यांचे उपनिबंधकांना साकडे : पुरक सेवा देण्याच्या सूचना
रूपेश खैरी वर्धा
तुरीचे दर पडल्याने शासनाने नाफेड आणि भारतीय खाद्य निगमच्या माध्यमातून शासकीय दरात तूर खरेदीचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार जिल्ह्यातील बाजार समित्यांत या दोन्ही शासकीय एजन्सीचे केंद्र सुरू केले; मात्र येथे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची बोंब असल्याने तूर घेवून आलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे.
वर्धा जिल्ह्यात बाजार समिती आणि त्यांच्या उपबाजारातून शेतमालाची खरेदी होत आहे. व्यापाऱ्यांकडून मिळणारे अत्यल्प दर टाळण्याकरिता नाफेडची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली. त्याच्या मदतील भारतीय खाद्य निगम आणि विदर्भ मार्केटींग फेडरेशनच्यावतीने हमीभावात तुरीची खरेदी होत आहे. यामुळे केंद्रावर शेतकऱ्यांची आवक वाढत आहे. अनेकांनी दर वाढीच्या प्रतीक्षेत तूर घरीच ठेवली होती. आणि आता तुरीचे नवे उत्पादनही निघणे सुरू झाले आहे. यामुळे बाजारात तुरीची आवक वाढत आहे. बाजारातील दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी आहे; मात्र येथे कर्मचाऱ्यांची कमतरता शेतकऱ्यांकरिता डोकेदुखी ठरत आहे.
शासकीय केंद्रावर तुरीची वाढलेली आवक आणि असलेली कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ होत आहे. शेतमाल घेवून आलेल्या शेतकऱ्यांना रात्र बाजार समितीच्या आवारातच काढावी लागत आहे. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी उपनिबंधक कार्यालयात धाव घेतली. शेतकऱ्यांच्या या तक्रारीवरून उपनिबंधक कार्यालयात नाफेड आणि भारतीय खाद्य निगमच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बाजार समितीच्या सभापतींची बैठक झाली. या बैठकीत केंद्रावरील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या, तसेच शेतकऱ्यांची होत असलेली धावपळ थांबविण्याकरिता नवे केंद्र सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती आहे.
सात केंद्रातून ४७ हजार क्विंटल खरेदी
जिल्ह्यातील सात शासकीय खरेदी केंद्रांमधून ४६ हजार ८२५ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. त्यामध्ये आर्वीत १२ हजार ६८६ क्विंटल, हिंगणघाट १९ हजार ५२२, वर्धा ४ हजार ५३१, सेलूत ६ हजार १४९, सिंदी (रेल्वे)त दोन हजार ९३६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांकरिता ही कागदपत्रे आवश्यक
शासकीय यंत्रणेला तुरीची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना काही कागदपत्रेही सोबत द्यावी लागत आहेत. त्यामध्ये सातबारा, पेरापत्रक, ओळखपत्र तसेच बँक पासबुकाची झेरॉक्स यंत्रणेला द्यावयाची आहे.
जास्तीत जास्त वेळ होणार खरेदी
जिल्ह्यात बाजार समितीत्यात नाफेड आणि भारतीय खाद्य निगमच्यावतीने शासकीय दरात तूर खरेदी होत आहे. मात्र हे केंद्र मोजकेच काळ सुरू राहत असल्याने येथे येणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण होते. वेळ संपल्याने अनेक शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल घेवून परतीचा मार्ग पकडावा लागत आहे. यात त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. यामुळे बाजार समितीतील केंद्र अधिकाधिक काळ सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
तीन नवे केंद्र सुरू होणार
सध्या हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, कारंजा (घाडगे) केंद्रावरून नाफेडची खरेदी होत आहे. तर वर्धा, सेलू आणि सिंदी येथे भारतीय खाद्य निगमची खरेदी आहे. यामुळे या केंद्रावर परिसरातील शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्याकरिता आणखी तीन नवे केंद्र उघडण्यात येणार आहे. यात समुद्रपूर, देवळी आणि सिंदी बाजार समितीचा समावेश आहे.