पालिकेचे ९०० वर कर्मचारी संपावर
By Admin | Updated: July 16, 2014 00:21 IST2014-07-16T00:21:18+5:302014-07-16T00:21:18+5:30
नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांकरिता आंदोलने केलीत; पण कुठलाही तोडगा निघाला नाही़ यामुळे कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे़ पहिल्याच दिवशी

पालिकेचे ९०० वर कर्मचारी संपावर
कामे ठप्प : अधिकाऱ्यांना निवेदन सादर
वर्धा : नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांकरिता आंदोलने केलीत; पण कुठलाही तोडगा निघाला नाही़ यामुळे कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे़ पहिल्याच दिवशी संपामध्ये जिल्ह्यातील सुमारे ९१० च्या वर कर्मचारी सहभागी झाले़ यामुळे जिल्ह्यातील सहाही नगर परिषदांतील कामे थांबली होती़
महाराष्ट्र ऩप़ कर्मचाऱ्यांतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र नगर परिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेतर्फे राज्यातील नगर परिषद कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मंगळवारपासून पुकारण्यात आला़ या संपात जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी व सिंदी (रेल्वे) या सहाही नगर परिषदेचे कर्मचारी सहभागी झाले आहे़ पाणीपुरवठा वगळता संप सुरू झालेला आहे. मागण्या मंजूर न झाल्यास शुक्रवारपासून पाणीपुरवठाही बंद करण्यात येणार असल्याचे ऩप़ कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष महेश दुबे यांनी सांगितले़ वर्धा नगर परिषदेमधील सुमारे ३२० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत़
दोनवेळा न्याय्य मागण्यांबाबत पूर्ण न झाल्याने तिसऱ्यांदा पालिकेचे १३६ सफाई व इतर कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत़ दुपारी १ वाजता नगर परिषद ते उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रलंबित मागण्यांबाबत उपविभागीय अधिकारी मनोहर चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऩप़ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय अंभोरे, उपाध्यक्ष अरुण पंड्या, सचिव देवेंद्र गोडबोले, किशोर नेवारे, चांदमल कश्यप, महेंद्र शिंगाणे, वैशाली बुटले, कृष्णा मडावी, महेंद्र कुरळकर, अजीत घडवे, मोहन थिगळे व सफाई कर्मचारी उपस्थित होते़ ऐन पावसाळ्यात कामबंद आंदोलन पुकारल्याने शहरातील स्वच्छता व अन्य कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
देवळी नगर परिषद कर्मचारी संघ राज्य न.प. कर्मचारी संघटनेच्या सलग्न असून संपात देवळी पालिकेचे पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी वगळता सर्व विभागातील कर्मचारी सहभागी झाले आहेत, अशी माहिती न.प. कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष नितीन सायंकर यांनी दिली़ संपात नगराळे, चिंचपाले, गजभिये, खोडे, डफरे, येनुरकर, धोबे, शेंडे बोरसरे, ताकसांडे, आनंद झाडे यांच्यासह सफाई कर्मचारी जीवन शेंडे, लता बेसरे व अन्य कर्मचारी सहभागी आहेत़
हिंगणघाट येथील विविध विभागातील ३०० कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत़ संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय खूपसरे, सुरेश आडेपवार, संजय मानकर, विश्वनाथ माळवे, मिलिंद पिंपळखूटे, प्रकाश लंके, प्रभाकर कन्नाके, मुरडीव, दिलीप झोरे, प्रवीण काळे, दीपक ठाकरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले़ पुलगाव नगर पालिकेतील १२३ कर्मचाऱ्यांपैकी पहिल्या दिवशी ५८ कर्मचारी सहभागी झालेत़ यावेळी कर्मचाऱ्यांनी ऩप़ मुख्याधिकारी भगत यांना मागण्यांचे निवेदन सादर केले़ सिंदी (रेल्वे) नगर परिषदेतील ५० कर्मचारीही संपामध्ये सहभागी झाले आहेत़
सफाई कर्मचाऱ्यांसह सर्व विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कामे ठप्प झालीत़ शिवाय शहरांतील स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)