कर्मचारी बदलले; पण फलकावर कायमच
By Admin | Updated: January 12, 2015 22:58 IST2015-01-12T22:58:12+5:302015-01-12T22:58:12+5:30
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात माहिती अधिकार कायदा २००५ चा फलक लावण्यात आला आहे़ यावर सहायक माहिती अधिकारी म्हणून बदलून गेलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आजही कायम आहे़

कर्मचारी बदलले; पण फलकावर कायमच
वर्धा : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात माहिती अधिकार कायदा २००५ चा फलक लावण्यात आला आहे़ यावर सहायक माहिती अधिकारी म्हणून बदलून गेलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आजही कायम आहे़ यामुळे माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज देणाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो़ अधिकाऱ्यांनी ही चुक सुधारणे गरजेचे झाले आहे़
प्रत्येक शासकीय कार्यालयात माहिती अधिकार कायद्याबाबत माहिती देणारा फलक लावणे अनिवार्य करण्यात आलेले आहे़ शिवाय या कार्यालयातील कोणत्या कर्मचारी, अधिकाऱ्यांकडे माहिती अधिकारातील कोणते पद आहे, याचाही फलक लावणे अनिवार्य करण्यात आलेले आहे़ यानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात फलक लावण्यात आलेला आहे़ या फलकावर सहायक माहिती अधिकारी म्हणून वरिष्ठ लिपीक ए़बी़ राठोड, माहिती अधिकारी म्हणून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत झाडे आणि अपिलीय अधिकारी म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही़आऱ माजरीकर यांचे नाव नोंदविलेले आहे़ यातील वरिष्ठ लिपीक राठोड हे सहा ते सात महिन्यांपूर्वी वर्धा येथून बदलून गेले आहेत़ त्यांच्या जागेवर दुसरे कर्मचारी कार्यरत आहेत; पण माहिती अधिकार फलकावरून त्यांचे नाव हटविण्यात आलेले नाही़ यामुळे माहितीचा अर्ज देणाऱ्या नागरिकांना अर्ज नेमका कुणाकडे द्यावा, सहायक माहिती अधिकारी कोण आहे, हे कळण्यास मार्ग नाही़
प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत सदर फलकावर सध्या कार्यरत कर्मचाऱ्याचे नाव सहायक माहिती अधिकारी म्हणून नोंदविणे गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)