विद्युत पुरवठा खंडित कृषी ग्राहकांना दिलासा
By Admin | Updated: September 2, 2014 23:57 IST2014-09-02T23:57:19+5:302014-09-02T23:57:19+5:30
राज्य शासनाने थकित वीज बिल कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या नवीन सुधारित कृषी संजीवनी योजनेचा लाभ आता तात्पूरते व कायम वीज पुरवठा खंडित असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार आहेत.

विद्युत पुरवठा खंडित कृषी ग्राहकांना दिलासा
कृषी संजीवनी योजना : साडेसहा हजार थकबाकीदारांना लाभ
वर्धा : राज्य शासनाने थकित वीज बिल कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या नवीन सुधारित कृषी संजीवनी योजनेचा लाभ आता तात्पूरते व कायम वीज पुरवठा खंडित असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार आहेत. याबाबतचे परिपत्रक संबंधित विभागांना प्राप्त झाले आहे.
कृषी ग्राहकांवरील वीज बिलाच्या थकित रकमेचा बोजा कमी करण्यासाठी राज्य शासनाने ‘कृषी संजीवणी २०१४’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, चालू कृषी ग्राहकांना त्यांच्या ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या मूळ रकमेची ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हप्त्यांमध्ये भरली तर उर्वरित ५० टक्के मूळ थकित रक्कम महाराष्ट्र शासनातर्फे महावितरणला विद्युत कायदा-२००३ कलम - ६५ प्रमाणे रोखीने व समप्रमाणात अनुदान स्वरुपात अदा करण्यात येणार आहे. तसेच योजनेचा लाभ घेणाऱ्या कृषी ३१ मार्च २०१४ पर्यंतचे थकित असलेले पूर्ण व्याज व दंड हे महावितरणतर्फे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार कृषी ग्राहकांना ५० टक्के मूळ थकबाकीची रक्कम ३१ आॅगस्ट व ३० सप्टेंबरपर्यंत प्रत्येकी २० टक्के व ३१ आॅक्टोबर २०१४ पर्यंत १० टक्के किंवा उर्वरित रक्कम भरता येणार आहे. ५० टक्के मूळ थकबाकी एकरकमी ३१ आॅगस्टपूर्वी भरता येऊ शकते, असा हा निर्णय आहे; मात्र योजनेतील कृषी ग्राहकांना १ एप्रिलनंतरची सर्व चालू वीज बिले पूर्णपणे व नियमित भरणा करावी लागणार, अशी अटही घातली आहे.
या निर्णयानुसार, ज्या कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा कायम खंडित करण्यात आला आहे. त्यांना मात्र कुठेही सामावून घेण्यात आलेले नव्हते; पण २८ आॅगस्ट रोजी शासनाने अध्यादेश काढून या शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यांनी ३१ आॅगस्टपर्यंत थकित रकमेपैकी २० टक्के रक्कम जमा करणे आवश्यक होते.
हा अवधी निघून गेल्यामुळे आता वीज पुरवठा तात्पूरता व कायम बंद असलेल्या कृषी ग्राहकांना या योजनेत समाविष्ट करण्याबाबत पेच निर्माण झाला आहे. सदर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ कसा घेता येईल आणि कसा देता येईल, याबाबत संबंधित कृषी ग्राहक आणि महावितरण बुचकळ्यात पडले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)