महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार
By Admin | Updated: December 20, 2014 22:45 IST2014-12-20T22:45:24+5:302014-12-20T22:45:24+5:30
महाकाळ या गावातील महिला व ग्रामस्वरक्षण दलाच्या कार्यकर्त्यांनी अवैध दारूविक्री व दुष्परिणामाना कंटाळून गावात सामूहिक दारूबंदीचा संकल्प केला. महिलांनी एकत्र येऊन दारूविक्रीविरोधात

महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार
दारू विक्रेते, मद्यपिंना दणका : महिला मंडळ ग्रामस्वरक्षण दलाचा इशारा
वर्धा : महाकाळ या गावातील महिला व ग्रामस्वरक्षण दलाच्या कार्यकर्त्यांनी अवैध दारूविक्री व दुष्परिणामाना कंटाळून गावात सामूहिक दारूबंदीचा संकल्प केला. महिलांनी एकत्र येऊन दारूविक्रीविरोधात एल्गार पुकारल्याने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
महाकाळ गावात मोठ्या प्रमाणात दारू निमिर्तीला व दारू विक्रीला जोर आला होता. गावातील युवापिढी दारूच्या आहारी जात आहे. यात काही दहा, बारा वर्षांच्या मुलांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे गावाचे नैतिक अध:पतन होत चालले असून घरा-घरातील शांतता यामुळे भंग पावत चालली आहे. या सर्व परिस्थितीचा येथील मुलांच्या, महिलांच्या आणि विशेष करून मुलींच्या मनावर विपरित परिणाम होत होता.
गुंडशाहीचे प्रमाण वाढून चौकामध्ये दारू पिणाऱ्या व्यक्ती शिवीगाळ करण्याचे प्रमाणही वाढले आहे. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत वर्धा जिल्हा दारू बंदी मोहिमेचे प्रमुख ज्ञानेश्वर येवतकर यांनी महाकाळ गावामध्ये दारू बंदीचा कार्यक्रम घेऊन गावामध्ये सामूहिक दारूबंदीचा संकल्प केला. या संकल्पाला गावातील महिला व ग्रामस्वरक्षण दलाने पुढाकार घेवून सामुहिक दारूबंदीची घोषणा केली. संपुर्ण दारूबंदी व दारू मुक्ती निर्देश २१ डिसेंबरपासून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या तारखेपासून दारूबंदी काटेकोरपणे पाळण्यात येणार आहे. अवैध दारू निमिती तसेचस कोणी पिऊन आढळल्यास त्यावर महिला मंडळ, ग्रामस्वरक्षण दल व पोलीस कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यावेळी देण्यात आला.
दारूमुळे गावाचा विकास खुंटला आहे. युवा पिढी दारूच्या नादी लागल्याने त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी गावच्या महिलांनी एकजूट होऊन दारुविक्री आणि इतरही अवैध धंद्यांविरोधात एल्गार पुकारला आहे.
या वेळी कार्यक्रमाला निवेदिता निलयम आश्रमचे रवी पंचक्रोशी, अभिमन्य भारतीय, सरपंच आशा महाकाळकर पोलीस पाटील, सविता धोटे, हिरा न्याहरे, वंदना मुंडे, शारदा फुन्ने, मनीषा कांबळे, सोनाबाई, स्मिता न्याहारे, वनमाला धवने, गोडे, नागेश धोटे, विक्रीम सहारे, निव्रती गायकवाड, विलास राऊत, प्रकाश मोहीते व साटोडा दारूबंदी महिला मंडळच्या महिला उपस्थित होत्या.(शहर प्रतिनिधी)