तारावर हूक टाकून सर्रास केली जातेय विजेची चोरी
By Admin | Updated: January 4, 2015 23:17 IST2015-01-04T23:17:55+5:302015-01-04T23:17:55+5:30
शासकीय जागेवर अतिक्रमण करून एकाने घर बांधले़ वीज जोडणी घेऊन शेजाऱ्यांनाही भाडे तत्वावर वीज पुरविली़ शिवाय एका वॉर्डात काही घरी नावापुरते मीटर घेऊन तारावर हुक

तारावर हूक टाकून सर्रास केली जातेय विजेची चोरी
तळेगाव (श्या़पं़) : शासकीय जागेवर अतिक्रमण करून एकाने घर बांधले़ वीज जोडणी घेऊन शेजाऱ्यांनाही भाडे तत्वावर वीज पुरविली़ शिवाय एका वॉर्डात काही घरी नावापुरते मीटर घेऊन तारावर हुक टाकून वीज घेण्याचा गोरखधंदा जोरात सुरू आहे़ विद्युत वितरण कंपनी मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़
काही वर्षांपासून ग्रामपंचायत, वनविभाग, राजस्व विभागाच्या जागेवर अतिक्रमण सातत्याने वाढत आहे. या शासकीय जागांवर वीज व नळजोडणी घेण्यासाठी संबंधित विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र असणे गरजेचे असते; पण या शासकीय जमिनीवर कुठलीही परवानगी न घेता अतिक्रमण करून घर बांधण्यात आले़ शिवाय विद्युत जोडणीही घेतली़ असाच प्रकार आर्वी रोडवरील वॉर्ड नं. ६ च्या काही भागात घडत आहे़ येथे थेट घरावरून गेलेल्या तारावर हुक टाकून वीज पुरवठा घेतला जातो़ यात वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे़ वीज वितरण कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते़ वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना याचा भुुर्दंड सोसावा लागत असल्याचे दिसते़
शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय वीज पुरवठा घेणे कायद्याने गुन्हा आहे़ शिवाय इतरांना भाडे तत्वावर वीज पुरविणेही गुन्हा आहे; पण हा व्यवसाय गावात सर्रास सुरू आहे़ अनेक वीज ग्राहकांनी शासकीय जागा बळकावून घर बांधले असून दुकाने थाटली आहेत़ या अतिक्रमणधारकांना ना-हरकत प्रमाणपत्र देता येत नाही; पण येथे वीज जोडणीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे़ ग्रा़पं़ च्या हद्दीतील अतिक्रमणात अतोनात वाढ झाली आहे़ या अतिक्रमीत घरांना ग्रा़पं़ प्रशासनाने चिरीमिरी घेऊन तसेच ग्रा.प. सदस्यांनी मतदार लक्षात घेऊन बेकायदा ना-हरकत दिल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे़ काहींनी तर ग्रा.पं. सदस्य व पुढाऱ्यांना हाताशी घेऊन वीज खांबावरून थेट आकोडा टाकून वीज पुरवठा घेतल्याचे निदर्शनास आले़
या वीज चोरीचा फटका सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना बसत असल्याचे दिसते़ महावितरणने या वीज चोरीकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे़(वार्ताहर)