वीज ‘अभियंता दाखवा पुरस्कार मिळवा’
By Admin | Updated: September 3, 2014 23:38 IST2014-09-03T23:38:02+5:302014-09-03T23:38:02+5:30
महावितरणच्या येथील कार्यालयात दोन महिन्यांपासून कनिष्ठ अभियंत्याचे पद रिक्त आहे़ यामुळे विजेच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे़ विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने याबाबत निवेदन देऊनही अभियंता

वीज ‘अभियंता दाखवा पुरस्कार मिळवा’
बजरंग दलाचे आंदोलन : त्वरित कनिष्ठ अभियंता देण्याची मागणी
सिंदी (रेल्वे) : महावितरणच्या येथील कार्यालयात दोन महिन्यांपासून कनिष्ठ अभियंत्याचे पद रिक्त आहे़ यामुळे विजेच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे़ विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने याबाबत निवेदन देऊनही अभियंता देण्यात आला नाही़ यामुळे मोर्चा काढून ‘अभियंता दाखवा, पुरस्कार मिळवा’, आंदोलन करण्यात आले़ यात विद्युत कार्यालयावर ताबा घेत त्वरित कनिष्ठ अभियंता देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली़
वीज वितरण कंपनीच्या येथील कार्यालयात कनिष्ठ अभियंता पदावर राष्ट्रपाल वालूंद्रे कार्यरत होते़ त्यांची दोन महिन्यांपूर्वी बदली झाली़ त्यांचा पदभार अन्य अभियंत्याकडे सोपविणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही़ सिंदी रेल्वे येथील कनिष्ठ अभियंत्याचे पद रिक्तच राहिले़ यामुळे नागरिकांच्या विजेबाबतच्या तक्रारींत वाढ झाली़ कृषी पंपाची वीज नादुरूस्त झाल्यास ती दुरूस्त होण्यास बराच कालावधी लागत होता़ यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते़ घरगूती वीज पुरवठ्यामध्ये बिघाड झाल्यास तो दुरूस्त करण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे़ यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़ शिवाय वेळी-अवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा फटका नागरिकांना बसत असल्याचे दिसते़ याबाबत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने विद्युत वितरण कंपनी नागपूर येथे मुख्य अभियंत्यांना निवेदन दिले; पण कुठलीही कारवाई झाली नाही़ यामुळे मंगळवारी अभियंता दाखवा, पुरस्कार मिळवा, आंदोलन करण्यात आले़ मोर्चा काढून वीज कंपनीच्या कार्यालयावर ताबा घेण्यात आला़ यावेळी त्वरित कनिष्ठ अभियंता देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली़(वार्ताहर)