ग्राहकांना सुरळीत सेवेसाठी वीज वितरणच्या अभियंत्यांचे आंदोलन
By Admin | Updated: October 18, 2015 02:31 IST2015-10-18T02:31:24+5:302015-10-18T02:31:24+5:30
योग्य साहित्य व मनुष्यबळ वेळोवेळी मिळत नसल्याने वीज वितरणचे अभियंते अडचणीत आले आहेत.

ग्राहकांना सुरळीत सेवेसाठी वीज वितरणच्या अभियंत्यांचे आंदोलन
देवळी : योग्य साहित्य व मनुष्यबळ वेळोवेळी मिळत नसल्याने वीज वितरणचे अभियंते अडचणीत आले आहेत. विभागाच्या अपूऱ्या व्यवस्थेमुळे ‘मेन्टनन्स’ची कामे थांबविण्यात आली आहेत. पिकांना पाणी देण्याच्या हंगामात ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रकार होत आहे. साहित्य नसल्याने अभियंत्यांची तारांबळ उडत आहे. यात शिवीगाळ व धक्काबुक्कीचे प्रकार होत आहेत. यामुळे वितरणविरूद्धच आंदोलनाची भूमिका अभियंत्यांनी घेतली आहे. ग्राहकांना सुरळीत सेवा मिळावी म्हणून बहुदा पहिल्यांदाच अभियंते आंदोलन करीत आहेत.
महावितरणच्या वर्धा विभागात देवळी, सेलू व वर्धा असे तीन तालुके आहेत. यातीन देवळी तालुक्यातील सुमारे दीड लाख ग्राहकांना सेवा दिली जाते. महावितरणचे जाळे जुने असल्याने जीर्ण झाले आहे. यामुळे ग्राहकांना सेवा देणे कठीण झाले आहे. याबाबत प्रशासनाला मागणी करूनही विद्युत लाईनची सुव्यवस्था करण्यास्तव योग्य उपाययोजना केल्या जात नाहीत. वेळोवेळी साहित्य उपलब्ध करून दिले जात नाही. यामुळे ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा व उत्तम सेवा देणे कठीण झाले आहे. यामुळे आता अभियंत्यांनीच आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ग्राहकांना सुरळीत सेवा मिळावी म्हणून वर्धा विभागातील ४० अभियंत्यांनी साखळी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे महावितरण काय भूमिका घेते, यानुसार आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे असोसिएशनचे विभागीय सचिव सचिन सोनसकर यांनी सांगितले.(प्रतिनिधी)