४८०० शेतकऱ्यांना मार्चअखेर मिळणार वीज जोडणी
By Admin | Updated: January 16, 2016 02:35 IST2016-01-16T02:35:13+5:302016-01-16T02:35:13+5:30
पाच वर्षांपासून जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांनी शेतातील विहिरीवर वीज जोडणी मिळावी म्हणून वीज कंपनीकडे हजारो रुपये अनामत रक्कम भरली.

४८०० शेतकऱ्यांना मार्चअखेर मिळणार वीज जोडणी
प्रशासनाला आदेश : ऊर्जा मंत्र्यांनी दिले लेखी आश्वासन
वर्धा : पाच वर्षांपासून जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांनी शेतातील विहिरीवर वीज जोडणी मिळावी म्हणून वीज कंपनीकडे हजारो रुपये अनामत रक्कम भरली. राज्य शासनानेही वीज जोडण्यांसाठी ४० कोटींची तरतूद करून निधी वीज वितरण कंपीला दिला; पण वीज कंपनीने अद्यापही जोडणी दिली नाही. यासाठी महात्मा फुले समता परिषदेसह शेतकऱ्यांनी आंदोलने केली. या आंदोलनांचे फलित म्हणून मार्च अखेरपर्यंत ४ हजार ८०० शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली जाईल, अशी लेखी ग्वाही उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
महात्मा फुले समता परिषदेने विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे व पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ४ हजार ८०० अनामत भरलेल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळावी म्हणून आंदोलन केले. ३० जानेवारी रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे पहिल्यांदा मंत्री म्हणून महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमात आले असता त्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावर त्यांनी त्वरित वीज जोडणी मिळेल, असे सांगितले. तीन महिन्यांत सर्व ४ हजार ८०० शेतकऱ्यांना वीज जोडणी देऊ, असे जिल्हा नियोजन समितीच्या सभेत जाहीर केले होते; पण ही घोषणा पूर्ण झाली नाही. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध आंदोलने करण्यात आली. ९ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांकडून आढावा घेत ३१ डिसेंबरपर्यंत संपूर्ण वीज जोडण्या देऊ, असे घोषित केले; पण दुसऱ्याच दिवशी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्धेतील सभेत वीज वितरण अधीक्षकाच्या सल्ल्याने तारीख बदलून ३१ जुलैपर्यंत देऊ, असे जाहीर केले. यामुळे शेतकऱ्यांचा हंगाम तर गेलाच; पण तारीख पे तारीखमुळे शेतकऱ्यांचे हाल होत होते.
शेतकरी आत्महत्यांमध्ये चार लाखांचे कर्ज घेऊन खोदलेल्या विहिरीवर वीज जोडणी नाही, हे एक कारण होते. यानंतर पुन्हा वीज जोडणी न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ जानेवारी २०१६ ला आंदोलन करण्यात आले. वीज जोडणी मिळाली नाही तर सेवाग्राम आश्रमासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा देण्यात आला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मुंबई मंत्रालयात बोलूवन घेत चर्चा करण्यात आली. यात ३१ मार्च २०१५ पर्यंत वीज जोडणीसाठी अनामत रक्कम भरलेल्या सर्व ४ हजार ८०० शेतकऱ्यांना ३१ मार्च २०१६ पर्यंत वीज जोडणी देण्यात येईल. १ एप्रिल २०१५ ते १२ जानेवारी २०१६ या कालावधीत अनामत भरलेल्या शेतकऱ्यांना १५ आॅगस्ट २०१६ पर्यंत वीज जोडणी देण्यात येईल, असे ना. बावनकुळे यांनी सांगितले. चर्चेच्या वेळी खासदार रामदास तडस उपस्थित होते. याप्रसंगी शंका उपस्थित करण्यात आल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांनी महात्मा फुले समता परिषदेच्या निवेदनावरच लेखी लिहून देत स्वत:ची स्वाक्षरी केली. त्याचवेळी काम पूर्ण करण्याबाबतच्या सूचना महावितरणचे अधीक्षक अभियंता देशपांडे यांना दूरध्वनीवरून देण्यात आल्यात.(कार्यालय प्रतिनिधी)