नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रंगत
By Admin | Updated: July 11, 2016 01:55 IST2016-07-11T01:55:21+5:302016-07-11T01:55:21+5:30
येथील नगर पालिकेच्या नगराध्यक्षाला जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशाद्वारे अपात्र ठरविल्याने नगराध्यक्षपदाकरिता मंगळवारी (दि. १२ जुलै) निवडणूक होणार आहे.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रंगत
सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी तर मंगळवारी निवडणूक
प्रभाकर शहाकार पुलगाव
येथील नगर पालिकेच्या नगराध्यक्षाला जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशाद्वारे अपात्र ठरविल्याने नगराध्यक्षपदाकरिता मंगळवारी (दि. १२ जुलै) निवडणूक होणार आहे. तर अपात्र ठरविलेल्या नगराध्यक्षासह पाच सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. अशातच इच्छुकांनी नामांकन दाखल केल्याने या सुनावणीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून गटनेता राजन चौधरी तर भाजपाकडून नगरसेविका सोनाली गाधने या दोघांनी नामांकन दाखल केले आहे. निवडणुकीच्या काळातच न्यायालयाची सुनावणी होत असल्याने निवडणूक रंगणार की अपात्र ठरलेले नगराध्यक्ष व पाच नगरसेवक न्यायालयातून स्थगनादेश मिळविण्यात यशस्वी होतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसच्या १० नगरसेवकांच्या, सहकारी पक्षाचा एक व अपक्ष तीन अश्या १४ नगरसेवकांच्या गटातून बाहेर पडलेल्या पाच नगरसेवकांना जिल्हाधिकारी वर्धा यांनी अपात्र ठरविले आहे. त्यांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली तर जिल्हाधिकाऱ्यांनी १२ जुलै रोजी पुलगाव येथील नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर केली. काँग्रेस पक्षातील परस्पर विरोधी गट या निवडणुकीच्या माध्यमातून आमने सामने उभे ठाकले आहेत.
सध्या परिस्थितीत अपात्र ठरलेल्या पाच नगरसेवकांना वगळून काँग्रेस व मित्रपक्ष गटाकडे नऊ तर भाजपाकडे पाच नगरसेवक आहेत. दोन्ही पक्षाकडून प्रत्येकी एका उमेदवाराचे नामांकन दाखल झाले आहे. अश्यातच अपात्र ठरविलेल्या पाच नगरसेवकांना जर उच्च न्यायालयातून दिलासा मिळाला तर काँग्रेसपक्षापुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे. या नगराध्यपदाच्या निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या भाजपाला डाव साधण्याची संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.