निवडणूक काळ; पण चर्चा रंगतेय नोटांची

By Admin | Updated: November 14, 2016 00:55 IST2016-11-14T00:55:13+5:302016-11-14T00:55:13+5:30

राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल फुंकला.

Election time; But the notes are colorful notes | निवडणूक काळ; पण चर्चा रंगतेय नोटांची

निवडणूक काळ; पण चर्चा रंगतेय नोटांची

एटीएमवर रांगा कायमच : मतदारांची नोटा बदलण्यासाठीच धावपळ
वर्धा : राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल फुंकला. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात निवडणुका होत आहेत. सर्वत्र निवडणुकीच्या तयारींना वेग आला. अशातच ८ नोव्हेंबरला ५००, १००० च्या नोटा रद्दचा निर्णय झाला आणि सर्वांना निवडणुकीचा विसर पडून नोटांचीच चर्चा रंगताना दिसून येत आहे.
निवडणुकीची जाहीर होताच सर्वत्र चहल-पहल निर्माण झाली होती. राजकीय पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती, तिकीटांसाठी नेत्यांची मनधरणी, कार्यकर्त्यांची जुळवाजुळव, संख्याबळ दाखविण्यासाठी लगबग, नंतर नामांकन दाखल करणे, प्रचार साहित्याची जुळवणूक करणे आदी सर्व सोपस्कार पार पाडले जात होते आणि अचानक मोदींनी ‘बॉम्ब’ टाकला. मंगळवार ८ नोंव्हेंबरला कामे सुरू होण्यापूर्वी ५००, १००० च्या नोटा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मग काय, कुठे निवडणूक विषयच निघत नसल्याचे पाहावयास मिळतेय. प्रचार सुरू, नेते मग्न, कार्यकर्ते जमलेले व नागरिकांत चर्चा मात्र रद्द झालेल्या नोटा आणि बँकांतील धावपळीची! परिणामी, निवडणूक रिंगणात उभ्या ठाकलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदांच्या उमदेवारांचा मात्र हिरमोड होताना दिसतोय.
जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणुका २७ नोव्हेंबर रोजी होत आहेत. या निवडणुकीच्या तयारीत प्रशासन व राजकीय नेते मंडळी व्यस्त असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्दचा ‘बॉम्ब’ टाकत काळा पैसा, भ्रष्टाचारी यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. खोऱ्याने नोटा असलेल्या उद्योगपती, व्यापारी, राजकीय नेते मंडळी, उमेदवार यांची या निर्णयामुळे चांगलीच फटफजिती झाली. निवडणूक आणि प्रचार सोडून सर्वांना आपल्याकडे असलेल्या नोटा बदलण्याचीच घाई सुटली. अनेकांनी आपल्या बँक खात्यांमध्ये पैसा ओतला तर काही ते वाटण्यात धन्यता मानत असल्याचे दिसते. असे असले तरी नागरिकही आता ५००, १००० रुपयांच्या नोटा घेण्यास तयार नसल्याचेच दिसून येत आहे. मोदींनी टाकलेला बॉम्ब सामान्यांनाच अधिक चटका लावून गेल्याचे सध्या दिसून येत आहे. बाजारपेठांसह बँकांमधील वातावरण सैरभैर झाले आहे. बँकांचे अन्य व्यवहार रखडले असून केवळ नोटा बदली करणे आणि पैसा खात्यांत जमा करणे, एवढेच व्यवहार होत असल्याचे दिसून येत आहे. सामान्य नागरिकांमध्ये केवळ नोटा बदली करण्याचाच विषय असल्याने सर्वांना निवडणुकीचा जणू विसरच पडल्याचे दिसून येत आहे.
आजपासून प्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात झाली असून उमेदवारांकडून रॅल्या काढल्या जात आहेत. मतदारांची घरोघरी जात मनधरणी केली जात आहे. प्रत्येकच उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांसह गल्लोगल्ली फिरण्याचे प्रयत्न करीत आहे. उमेदवार कार्यकर्ते व नेत्यांसह मतदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करीत असले तरी मतदार मात्र सध्या बँका आणि एटीएमच्याच चकरा मारताना दिसून येत आहे. पाचव्या दिवशीही शहरातील प्रत्येक बँकेत लांब रांगा लागलेल्या असून एटीएम केंद्रांवरही कित्येक तास उभे राहावे लागत असल्याचे दिसून येत आहे. ५००, १००० रुपयांच्या नोटा कुठेही घेतल्या जात नसल्याने आणि सुटे पैसे मिळत नसल्याने प्रत्येकाच्या मुखातून केवळ हाच विषय चर्चिला जात आहे. कुणालाही निवडणुकीचे सोयरसुतक नसून आपले पैसे कसे परत मिळविता येईल, घर खर्च कसा चालविता येईल, दैनंदिन व्यवहार कसे पार पाडता येतील यातच मतदारराजा व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
बसस्थानक असो, रेल्वे स्थानक असो, कट्ट्यावर असो वा कुठेही चार लोक भेटलेले असो सर्वत्र मोदींचा धाडसी निर्णय आणि रद्द झालेल्या नोटा यांचीच चर्चा रंगत आहे. मतदार चवीने याबाबत चर्चा करीत असताना कुठेही निवडणुकीचा विषय निघत नसल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार व त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते हेच लोक निवडणुकीची चर्चा करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
या सैरभैर वातावरणात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांना हिरमुसलेपणेच प्रचार करावा लागत असल्याचेही एकूण हावभाव आणि मतदारांच्या चर्चांवरून दिसून येत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Election time; But the notes are colorful notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.