हत्येप्रकरणी एकाला आजन्म कारावास
By Admin | Updated: October 21, 2015 02:17 IST2015-10-21T02:17:50+5:302015-10-21T02:17:50+5:30
आपसी वादातून सावली (वाघ) येथील गंगाधर फरताडे याची हत्या करणाऱ्या सुनील बरबटकर याला ...

हत्येप्रकरणी एकाला आजन्म कारावास
वर्धा : आपसी वादातून सावली (वाघ) येथील गंगाधर फरताडे याची हत्या करणाऱ्या सुनील बरबटकर याला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल येथील न्यायाधीश अनिरूद्ध चांदेकर यांनी मंगळवारी दिला.
घटनेची थोडक्यात हकिकत अशी की, ६ जानेवारी २०१४ रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान बाबाराव राजुरकर यांच्याकडील कापूस बाबाराव राजुरकर त्यांचा मुलगा रूपेश राजुरकर, गंगाधर फरकाडे आणि हरिभाऊ विरूळकर कापूस मिनीडोअरमध्ये भरत होते. दरम्यान, सुनील याने राजुरकरच्या घराजवळ येत गंगाधर फरकाडेला ओढत मोरेश्वर जेणेकर याच्या घराकडे नेले व तेथे चाकूने त्याच्या पोटावर व छातीवर वार केले. गावकऱ्यांनी त्याला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय येथे भरती केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची तक्रार रूपेश राजुरकर याने हिंगणघाट पोलिसात केली. पोलिसांनी भांदविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले.
सदर प्रकरणात न्यायालयात आले असता सरकारी वकील अनुराधा सबाने यांनी घटना सिद्ध करण्यासाठी एकूण सात साक्षीदार तपासले. साक्ष पुरावे व वैद्यकीय अहालावरून न्यायाधीशांनी सुनील बरबटकर याला कलम ३०२ अंतर्गत आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच ५००० रुपयांचा दंड दिला. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त शिक्षा कारावासाची सुनावली.(प्रतिनिधी)