आठव्या वर्गाच्या अफवेने पालक त्रस्त
By Admin | Updated: May 6, 2015 00:04 IST2015-05-06T00:04:15+5:302015-05-06T00:04:15+5:30
जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत आठवा वर्ग निर्माण होणार असल्याच्या अफवेने जिल्ह्यात चांगलाच उधम घातला आहे.

आठव्या वर्गाच्या अफवेने पालक त्रस्त
काही ठिकाणाहून वाढीव वर्गांचा प्रस्ताव : अनेक शाळेतून दाखला देण्यास नकार
वर्धा : जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत आठवा वर्ग निर्माण होणार असल्याच्या अफवेने जिल्ह्यात चांगलाच उधम घातला आहे. यामुळे काही शाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतून सातव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना दाखला देण्यास नकार देणे सुरू केले आहे. यामुळे पाल्याच्या प्रवेशाकरिता पालकांसमोर चिंता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी जि.प.च्या उच्च प्राथमिक शाळा आहेत. यात सातव्या वर्गापर्यंत शिक्षण दिले जात आहे. आता त्या शाळेत आठवा वर्ग येणार असल्याची चर्चा जिल्ह्यात जोर धरत आहे. वास्तविकतेत ज्या भागात आठवा वर्ग असलेली शाळा तीन किमी अंतरात आहे, त्या शाळेत जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवा वर्ग निर्माण करणे शक्य नसल्याचे शिक्षण कायदा सांगत आहे. ज्या भागात अशा शाळा नाही त्या भागात आठवा वर्ग सुरू होणार असा प्रस्ताव जिल्हा परिषदेत तयार झाला नाही, अथवा तशा शासनाच्या कुठल्या सूचनाही नसल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेच्या असलेल्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा टिकविण्याची समस्या त्यांच्यासमोर आली आहे, अशात पुन्हा त्या वर्ग वाढ करण्याची तयारी सध्यातरी जिल्हा परिषदेची नसल्याची माहिती आहे. असे असताना जिल्ह्यात पसरत असलेली ही अफवा शिक्षण विभागाकरिता चिंतेचा विषय ठरत आहे. याचा त्रास पालकांना सहन करावा लागत आहे. त्यांना मुलांचे दाखले मिळण्यास अडचण होत आहे. याकडे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(प्रतिनिधी)
काही शाळा व्यवस्थापन समितीने दाखल केले प्रस्ताव
जिल्ह्यातील काही शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी त्यांच्या भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत सातव्या वर्गानंतर आठवा वर्ग देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत सादर केला आहे. त्या भागात तीन किमी अंतराच्या नियमात शाळा असल्याने आठवा वर्ग देण्यात येणे शक्य नसल्याचे या समितींना शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आल्याची माहिती आहे.
दाखल्यांकरिता पालकांची अडवणूक
जिल्ह्यात असलेल्या काही उच्च प्राथमिक शाळेतून पालकांना मुलांचा शाळा सोडल्याचा दाखला देण्यास नकार देण्यात येत आहे. यामुळे मुलांना आठवीत प्रवेश देण्याकरिता त्यांना अडचणीचे ठरत आहे. सातवा वर्ग सोडल्याचा दाखला मिळाल्यास मुलाला गावातील वा शहरातील शाळेत प्रवेश देणे सोपे जाईल अशा प्रतिक्रीया पालकांकडून मिळत आहे. मात्र जि.प.च्या शाळेतील या शिक्षकांकडून अडवणूक होत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत आठवा वर्ग देण्याचा जिल्हा परिषदेचा प्रस्ताव नाही वा तशा अद्याप शासनाच्या सूचना नाही. काही शाळा व्यवस्थापन समितीचा प्रस्ताव आहे. असे असले तरी त्या भागात तीन किमी अंतरात दुसरी शाळा असल्यास तेथे परवानगी देणे शक्य नाही.
- रवींद्र काटोलकर, शिक्षणाधिकारी, (प्राथमिक) जि.प. वधा