आठ महिन्यांत अवैध वृक्षतोडीचे दाखल केले तब्बल 148 गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 05:00 IST2020-12-18T05:00:00+5:302020-12-18T05:00:01+5:30
मागील आठ महिन्यांच्या काळात वन विभागाने धडक कारवाई करून एकूण ३०१ गुन्हे दाखल केले आहेत. यात अवैध वृक्षतोडीचे १४८, अवैध वाहतुकीचे नऊ, वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवून ४३, वन्यप्राणी ६४, वनवनवा प्रकरणी १७, अवैध चराई प्रकरणी ७ तर इतर १३ गुन्हे दाखल केले आहेत. या दाखल गुन्ह्यांपैकी तब्बल ३०.२३ टक्के गुन्हे वनविभागाने निकाली काढले आहेत.

आठ महिन्यांत अवैध वृक्षतोडीचे दाखल केले तब्बल 148 गुन्हे
महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळेच शासन स्तरावर वृक्ष लागवड योजना राबवून शासनाच्या या उपक्रमात प्रत्येक नागरिकाला सहभागी करून घेतले जात आहे. पण विकासाच्या नावावर सध्याच्या विज्ञान युगात अवैध वृक्षतोड होत असून मागील आठ महिन्यांच्या काळात वनविभागाने धडक कारवाई करून अवैध वृक्षतोड प्रकरणी तब्बल १४८ गुन्हे दाखल केले आहे. त्यापैकी ६६ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून ८२ प्रकरणे सध्या प्रलंबीत असल्याचे सांगण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, मागील आठ महिन्यांच्या काळात वन विभागाने धडक कारवाई करून एकूण ३०१ गुन्हे दाखल केले आहेत. यात अवैध वृक्षतोडीचे १४८, अवैध वाहतुकीचे नऊ, वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवून ४३, वन्यप्राणी ६४, वनवनवा प्रकरणी १७, अवैध चराई प्रकरणी ७ तर इतर १३ गुन्हे दाखल केले आहेत. या दाखल गुन्ह्यांपैकी तब्बल ३०.२३ टक्के गुन्हे वनविभागाने निकाली काढले आहेत. तर उर्वरित गुन्हे वेळीच निकाली काढण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
एकूण ९१ गुन्हे काढले निकाली
गत आठ महिन्यांत वनविभागाने तब्बल ३०१ गुन्हे दाखल केले आहेत. असे असले तरी अवैध वृक्षतोडीचे ६६, अवैध वाहतुकीचे दोन, अतिक्रमणचे तीन, वन्यप्राणीचे नऊ, वनवनवाचे सात, अवैध चराईचा एक तर इतर तीन गुन्हे असे एकूण ९१ गुन्हे झटपट निकाली काढले आहेत.