जिल्ह्यात ईद ए मिलाद उत्साहात
By Admin | Updated: December 25, 2015 02:48 IST2015-12-25T02:48:42+5:302015-12-25T02:48:42+5:30
मुस्लीम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस संपूर्ण जगात ईद-ए-मिला दुन्नबीच्या रुपाने जल्लोषात साजरा केला जातो.

जिल्ह्यात ईद ए मिलाद उत्साहात
मिरवणूक : सर्व मशिदींच्या ईमामांचा सत्कार
वर्धा : मुस्लीम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस संपूर्ण जगात ईद-ए-मिला दुन्नबीच्या रुपाने जल्लोषात साजरा केला जातो. शहरासह जिल्ह्यातही मुस्लीम बांधवांनी ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. शहरातील सर्व मशिदींना आकर्षण रोषणाई करण्यात आली होती. तसेच विविध कार्यक्रम व उपक्रमही राबविण्यात आले.
वर्धा शहरात महादेवपुरा येथील जामा मशीदच्या वतीने सर्व मशिदींच्या इमामांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वर्धा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुरलीधर बुराडे, लॉयन्स क्लबचे अद्यक्ष राहुल सराफ, जामा मशीदचे उपाध्यक्ष अत्ताउल्ला पठाण आदींची उपस्थिती होती. यावेळी जामा मशीदचे इमाम हाफिज अयुब, नगिना मशीदचे इमाम मुस्ताक अहमद यांच्यासह इतरही मशिदींच्या इमामांचा सत्कार आयोजकांच्या हस्ते करण्यात आला.
बजाज चौकातून शहरातील १२ मशिदींच्या इमामांच्या नेतृत्वात जल्लोषपूर्ण वातावरणात मुख्य मार्गावरून चित्ररथांद्वारे जुलूस काढण्यात आला. महादेवपुरा येथील जाम मशिदमध्ये या जुलूसचे विसर्जन झाले. संपूर्ण मार्ग पताका व आकाशकंदिलांनी सजविण्यात आला होता. सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी नौशाद, मक्सूदभाई, इमरान, रफान, समशेर, हनुमान, इंदर सराफ, नंदू वांदिले, इशाक अली, फैजान, मुजाहिद पठाण, आकिद पठाण, साकिद, बबलू पेंटर शौकत आदींसह इतरही मुस्लीम बांधवांनी सहकार्य केले. सर्वच धर्माचे नागरिक या उत्सवात सहभागी झाले होते. जिल्हाभरातील मुस्लीम बांधव येथे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)