गवंडी कामगारांच्या निवृत्ती वेतनासाठी प्रयत्नरत
By Admin | Updated: May 28, 2016 02:12 IST2016-05-28T02:12:52+5:302016-05-28T02:12:52+5:30
ज्यांच्या कष्टातून प्रत्येकाच्या स्वप्नातील घर साकारल्या जाते तोच बांधकाम कामगार आयुष्याच्या अखेरीस मरण यातना भोगतो.

गवंडी कामगारांच्या निवृत्ती वेतनासाठी प्रयत्नरत
रामदास तडस : बांधकाम कामगारांचा मेळावा
वर्धा : ज्यांच्या कष्टातून प्रत्येकाच्या स्वप्नातील घर साकारल्या जाते तोच बांधकाम कामगार आयुष्याच्या अखेरीस मरण यातना भोगतो. आयुष्यभर राबताना त्यांच्याकडे हक्काची शिल्लक राहत नाही. बांधकाम कामगारांसाठी निवृत्ती वेतन योजनेची गरज आहे. हे कामगार असंघटीत असल्याने त्यांना न्याय मिळत नाही. या कामगारांना निवृत्ती वेतन मिळावे म्हणून प्रयत्न करणार अशी ग्वाही खासदार रामदास तडस यांनी दिली.
येथील अनेकांत स्वाध्याय मंदिर येथे इमारत व इतर बांधकाम कामगारांकरिता कल्याणकारी योजना उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. पंकज भोयर, भाजपाचे राज्य प्रवक्ते आ. गिरीष व्यास, माजी खासदार सुरेश देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरीया, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष बाळा जगताप, कामगार अधिकारी राजदीप धुर्वे, जयंत कावळे, महेश दुबे, प्रशांत इंगळे तिगावकर, गवंडी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पांडे, यशवंत झाडे, राहुल चोपडा व आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. तडस म्हणाले, बांधकाम कामगारांसाठी मेळावा आयोजित करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. केंद्र व राज्य सरकारने असंघटीत कामगार व सर्व सामान्यांसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. मनरेगाच्या माध्यमातून शेतकरी व शेतमजुरांना काम उपलब्ध करून देण्यात आले. याचप्रमाणे बांधकाम कामगारांकरिता योजना सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर आमदार पंकज भोयर व आमदार गिरीष व्यास यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले.
मेळाव्याचे संचालन इब्राहम बक्श आझाद यांनी केले तर आभार यशवंत झाडे यांनी मानले. केंद्रीय परिवहन व जहाज मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिवसानिमित्त आ. डॉ. पंकज भोयर यांच्या वतीने हा मेळाव्या घेण्यात आला होता. यावेळी कामगार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याकरिता भाजप कार्यकर्ते यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)