लोकअदालतीतून तडा गेलेली मने जोडण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: December 16, 2015 02:21 IST2015-12-16T02:21:21+5:302015-12-16T02:21:21+5:30
लोक न्यायालयाद्वारे तडाजोडीचा मार्ग दाखविला जातो व दोन तडा गेलेल्या मनांना येथे जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो.

लोकअदालतीतून तडा गेलेली मने जोडण्याचा प्रयत्न
ए. एम. चांदेकर : ५९२ प्रलंबित प्रकरणे निकाली
वर्धा : लोक न्यायालयाद्वारे तडाजोडीचा मार्ग दाखविला जातो व दोन तडा गेलेल्या मनांना येथे जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. दोन्ही बाजूंनी दोन पावले पुढे येऊन हातमिळवणी केली तर सौख्य नांदते, असे प्रतिपादन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्रधिकरणाचे अध्यक्ष ए.एम. चांदेकर यांनी केले. राष्ट्रीय लोक अदालत उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा शासकीय अभियोक्ता अनुराधा सबाने, विधीज्ञ मंडळ वर्धा अध्यक्ष पी.एम. देशपांडे उपस्थित होते. सलील यांनी लोक अदालतीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपसी तडजोडीने भूसंपादन प्रकरणांचा लोक अदालतीचे माध्यमातून निपटारा करावा. तसेच भूसंपादन प्रकरणांमध्ये काही अडचणी असल्यास अडचणी शासनस्तरावर मांडता येतील. यात योग्य तो मोबदला मिळवून देण्यास शासन तत्पर राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यापुढे होणाऱ्या लोक अदालतीकरिता भूसंपासदन प्रकरणांचा जास्तीत जास्त निपटारा करण्याबाबत व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्याबाबत प्रयत्न करा, असे सलिल म्हणाले.
यावेळी सर्व जिल्हा न्यायाधीश, सर्व दिवाणी न्यायधीश, वरिष्ठस्तर व कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश हजर होते. कार्यक्रमादरम्यान जिल्हा विधी सेवा प्रधिकरणाचे सदस्य सचिव सु.ना. राजूरकर यांनी लोक अदालतीचे महत्त्व उपस्थितांना पटवून सांगितले. लोक अदालतीच्या माध्यमातून आपसातील तंटे, वाद मिटवून त्यांना पूर्णविराम द्यावा, असे प्रतिपादन करून लोक अदालतीचे नियोजन व पॅनलबाबत मार्गदर्शन केले.
संचालन आ.के. आवारी यांनी केले तर आभार अमोलकुमार देशपांडे यांनी मानले. जिल्ह्यामध्ये प्रत्येक न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत प्रलंबित प्रकरणांपैकी ५९२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच वाद व पूर्व प्रकरणापैकी ९८५ प्रकरणे आपसी तडजोडीतून निकाली काढण्यात आलीत. विशेष म्हणजे निकाली काढलेल्या प्रकरणांमध्ये तडजोडीच्या रकमेचे मुल्य १ कोटी ८३ लाख ६६ हजार ३५१ रूपये इतके होते, अशी माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली.(स्थानिक प्रतिनिधी)