कुशल हातांअभावी यंत्रणा कुचकामी
By Admin | Updated: May 8, 2015 01:47 IST2015-05-08T01:47:00+5:302015-05-08T01:47:00+5:30
जिल्हा प्रशासनाची आपत्ती निवारण यंत्रणा साहित्यानिशी सुसज्ज असली तरी प्रशिक्षणाचा अभाव आहे.

कुशल हातांअभावी यंत्रणा कुचकामी
श्रेया केने वर्धा
जिल्हा प्रशासनाची आपत्ती निवारण यंत्रणा साहित्यानिशी सुसज्ज असली तरी प्रशिक्षणाचा अभाव आहे. नियमानुसार किमान प्रत्येक सहा महिन्यांमध्ये आपत्ती निवारण पथकाचे सराव पथसंचलन होणे गरजेचे असते; मात्र जिल्हा प्रशासनाकडून गत दीड वर्षात प्रात्याक्षिक अथवा सराव करून झाला नाही. त्यामुळे आपत्तीकाळात काम करणाऱ्या यंत्रणा या उपलब्ध साधनांचा वापर कशा पद्धतीने करणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. जिल्हा आपत्ती निवारण समितीचे प्रशिक्षण, सरावाबाबत असलेली उदासिनता याला कारणीभूत ठरत आहेत.
जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त जिल्हास्तरावर असलेल्या आपत्ती निवारण यंत्रणेचा आढावा घेतला असता ‘सरावाचा अभाव’ ही बाब प्रकर्षाने पुढे आली. रेड क्रॉस ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक चळवळ आहे. या माध्यमातून जागृती करणे, नैसर्गिक अथवा अन्य आपत्तीच्या काळात मदत व बचाव कार्यात शासकीय यंत्रणेला मदत करणे याकरिता कार्य करते. या दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर कार्यरत असलेल्या आपत्ती निवारण कक्ष असून जिल्ह्यात साधनांची उपलब्धता आहे. मात्र प्रशिक्षणाचा अभाव आहे. आपत्ती काळात नागरिकांच्या प्राणांचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेला शासकीय उदासिनतेचा सामना करावा लागत आहे. सराव, प्रशिक्षण घेण्याबाबत शासकीय अधिकारी जागरूक नसल्याचे दिसते. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास नागरिकांनी बचाव पथकाकडे मदत मागितल्यास बचाव पथक कितपत कार्य करू शकेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
जागतिक रेडक्रॉस दिन : जिल्हास्तरावर आपत्ती निवारण कक्ष
आपत्तीच्या काळात मदत कार्य अथवा बचाव कार्यासाठी शासकीय यंत्रणा असते. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षामार्फत त्याचे संचलन केले जाते. यात आरोग्य प्रशासन, पोलीस प्रशासन, गृहरक्षक दल यांचा प्रामुख्याने समावेश असतो. जिल्ह्यात उद्भवलेल्या आपत्तीच्या स्थितीत ही यंत्रणा कार्य करते. केंद्र व राज्य शासनाकडून यंत्रणेला निधी देण्यात येतो. जिल्ह्यातील आपत्ती निवारण कक्षाकडे साधनांची मुबलकता आहे. शिवाय निधी असल्याने आवश्यक साधनांची खरेदी करण्यात आली. या साधनांचा वापराचे प्रशिक्षण दिले नसल्याने ते निरुपयोगी आहे.
बचाव कार्यात गृहरक्षक दल, पोलीस प्रशासन यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. जिल्ह्याच्या आपत्ती निवारणाची मुख्य जबाबदारी गृहरक्षक दलाकडून पार पाडली जाते. गत दोन वर्षात १० बचाव कार्य या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केले.
प्रशिक्षणाचा अभाव
बचाव यंत्रणेला प्रशिक्षण दिल्यानंतर प्रत्येक दोन महिन्यांनी नाही तर किमान सहा महिन्यांत एकदा सराव करून घेणे आवश्यक असते. मात्र जिल्हास्तरावर अशी कोणतीच कार्यवाही केली जात नाही. २०१३-१४ मध्ये दिलेल्या प्रशिक्षणानंतर सराव, मॉकड्रिल करून घेण्यात आली नसल्याची माहिती आहे.
आपत्तीचे स्वरूपही बदलत असून साधनांमध्येही आधुनिकता आली आहे. याकरिता पथकाला याची माहिती, सराव असणे आवश्यक आहे. अन्यथा बचाव कार्यात मोठा अडसर निर्माण होवू शकतो.
आपत्तीच्या काळात आरोग्य यंत्रणेचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. जिल्हा रूग्णालय, तालुकास्तर व ग्रामीण भागात आपत्ती काळात कार्य करण्यासाठी एक पथक असते. भूकंप, पूर अशा आपत्तीत साथ रोगाची भीती असते. त्यामुळे यावर नियंत्रण करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
रेडक्रॉस या संस्थेचे असलेले अधिकचे चिन्ह पूर्वी डॉक्टरांकडून वापरण्यात येत होते; मात्र आयएमए व अधिकृत संस्थांनी या चिन्हाला आरोग्य यंत्रणेचे बोधचिन्ह म्हणून बाद ठरविले आहे.
रेड क्रॉसच्या माध्यमातून देशस्तरावर अनेक जागृतीचे उपक्रम पार पाडले जातात. शासकीय यंत्रणेला उपक्रमात सहकार्य केले जाते. जिल्हास्तरावर रेडक्रॉस संघटना सक्रीय नाही.
जागतिक रेडक्रॉस दिन हा डॉ. हॅनी ड्यूनंत यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. त्यांनी या संघटनेची स्थापना करून आंतरराष्ट्रीय स्तरावर चळवळीत रूपांतर केले. ही सामाजिक संघटना एक चळवळ झाली असून या माध्यमातून आपत्ती काळात मदत व बचाव कार्यात सहकार्य करण्यात येते.