पुरातन काळापासूनच मानवी जीवनावर नॅनो टेक्नॉलॉजीचा प्रभाव
By Admin | Updated: March 1, 2016 01:30 IST2016-03-01T01:30:08+5:302016-03-01T01:30:08+5:30
‘आज संपूर्ण जगात ‘नॅनोटेक्नॉलॉजी’ याविषयी चर्चा सुरू असून याने मानवी जीवन ढवळून निघाले आहे.

पुरातन काळापासूनच मानवी जीवनावर नॅनो टेक्नॉलॉजीचा प्रभाव
प्रमोद येवले : ‘नॅनोटेक्नॉलॉजी आज आणि उद्या’ राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन
वर्धा : ‘आज संपूर्ण जगात ‘नॅनोटेक्नॉलॉजी’ याविषयी चर्चा सुरू असून याने मानवी जीवन ढवळून निघाले आहे. नॅनोटेक्नॉलॉजी ही संज्ञा जरी नवीन असली तरी पुरातन काळापासूनच मानवी जीवनावर नॅनोटेक्नॉलॉजीचा प्रभाव आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. प्रमोद यावले यांनी केले.
जानकीदेवी बजाज महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डीबीटी, डीएसटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नॅनोटेक्नॉलॉजी आज आणि उद्या’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.
चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी शिक्षा मंडळचे सभापती संजय भार्गव होते. मंचावर विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली येथील सुपर कॉम्प्युटरींग मिशन आणि सुवर्ण जयंती फेलोशिप विभागाचे प्रमुख मिलिंद कुळकर्णी, नॅशनल केमिकल लेबॉरटरी पुणेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अब्सार अहमद, पुणे येथील ‘सि-मेट’चे संचालक डॉ. भारत काळे, दिल्ली विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक डॉ.रामपाल टंडन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओम महोदय, डॉ.शेषराव बावणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. मिलिंद कुळकर्णी मार्गदर्शन करताना म्हणाले की, सध्या देशात सुरू असलेला ‘मेक इन इंडिया’ हा चर्चेत असलेला उपक्रम नॅनोटेक्नॉलॉजीला संयुक्तीक विषय आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये कमतरता नाही. फक्त गरज आहे ती या क्षेत्रातील संशोधकांनी नवनवीन संकल्पनेवर कार्य करण्याची.
आपल्या पॉवर पॉर्इंट प्रेझेन्टेशन द्वारे डॉ.कुळकर्णी यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विद्यागाद्वारे सुरू असलेल्या अनेक निधीवाटप योजना संशोधक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या.
प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ. ओम महोदय यांनी महात्मा गांधी स्मृती सभागृह हे ऐतिहासिक असून याच सभागृहामध्ये गांधीजींच्या ‘नई तालीम’चा जन्म झाल्यााचे सांगितले. महात्मा गांधीजींच्या सुक्ष्म निरीक्षणाद्वारे आज आपण ‘नई तालीम’ पासून नॅनोटेक्नॉलॉजी पर्यंत येऊन पोहोचलो आहोत. या चर्चासत्रामध्ये विविध राज्यातील संशोधक, शिक्षक आणि विद्यार्थी हे केवळ पीबीएएस गुणांसाठी किंवा प्रमाणपत्रासाठी आलेले नसून खऱ्या अर्थाने शास्त्रज्ञांच्या भेटीसाठी व ज्ञान प्राप्त करण्यासाठी आले आहेत. विदर्भात नॅनोटेक्नॉलॉजीवर भरीव काम करण्याच्या उद्देशाने या चर्चासत्रासोबत कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
तंत्रज्ञ न घडविता शास्त्रज्ञ घडवायचे आहे
वर्धा : चर्चासत्रात संजय भार्गव यांनी शिक्षा मंडळाचे वगळेपण विषद केले. ही संस्था शिक्षण क्षेत्रातील कुठल्याच कु-प्रथेची घटक नसून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्यास सदैव तत्पर असल्याचे ते म्हणाले. या जगात नेहमीच शाश्वत असणारी गोष्ट म्हणजे परिवर्तन होय. शिक्षा मंडळात केवळ तंत्रज्ञ न घडवता शास्त्रज्ञ घडवायचे आहेत. ज्या गोष्टीची चाहूल लागते, जग त्याच्याकडे आशेने पाहत असते. नॅनोटेक्नॉलॉजी ही सुद्धा अशीच एक आशादायी संकल्पना आहे. एखाद्या व्यक्तीची सृजनशीलता ही त्याच्यापुरतीच मर्यादित न राहता समाजाच्या उपयोगी पडली पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या सृजनशील बुद्धीला व्यावहारिकतेची जोड दिली तरच ते आपल्या जीवनात यशस्वी होतील.
प्रारंभी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व विद्यापीठ गीत सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय भार्गव यांनी मंचावरील मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय चर्चासत्राच्या स्मरणिकेचे प्रकाशन केले. यावेळी मिलिंद कुळकर्णी व डॉ. प्रमोद येवले यांना शिक्षा मंडळाचे उपाध्यक्ष भरत महोदय व प्रा. रामप्रसाद गौतम यांनी महात्मा गांधींची प्रतिमा भेट देऊन त्यांचा गौरव केला. कार्यक्रमासाठी एमगिरीचे सहकार्य लाभले. संचालन प्रा.डॉ. प्रतिभा धाबर्डे, प्रा. गोविंद लखोटीया यांनी केले तर आभार चर्चासत्राचे समन्वयक डॉ. शेषराव बावणकर यांनी मानले. कार्यक्रमाला देशभरातून आलेले संशोधक, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षा मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, महा.तील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)