शिक्षण, आरोग्य, घरकूलवर गाजली आमसभा

By Admin | Updated: March 8, 2015 01:25 IST2015-03-08T01:25:45+5:302015-03-08T01:25:45+5:30

स्थानिक पंचायत समितीची वार्षिक आमसभा आमदार अमर काळे यांच्या अध्यक्षतेत पार पडली़ यात विविध विषयांवर जोरदार चर्चा झाली़ ...

Education, Health and Family Welfare | शिक्षण, आरोग्य, घरकूलवर गाजली आमसभा

शिक्षण, आरोग्य, घरकूलवर गाजली आमसभा

आष्टी (शहीद) : स्थानिक पंचायत समितीची वार्षिक आमसभा आमदार अमर काळे यांच्या अध्यक्षतेत पार पडली़ यात विविध विषयांवर जोरदार चर्चा झाली़ शिक्षण, आरोग्य, घरकूल, सिंचन विहिरी, मनरेगा आदी विषयांवर सरपंच, नागरिकांनी आवाज उठविला़ पं़स़ सभापती, उपसभापती व २० गावांतील सरपंच सभेला गैरहजर राहिल्याने निषेधाचा ठराव पारित करण्यात आला़
अतिथी म्हणून जि़प़ सदस्य बेबी बिजवे, नंदकुमार कंगाले, पं़स़ सदस्य डॉ़ प्रदीप राणे, मुजाहिर खॉ साहेब खॉ, माजी पं़स़ उपसभापती साहेब खॉ पठाण, जि़प़ सदस्य आशा खेरडे, पं़स़ सदस्य माधुरी बुले, उपमुख्य कार्यपालन अधिकारी भुयार, बीडीओ येवला, एसडीओ ठाकरे उपस्थित होते़ पं़स़ सभापती, उपसभापती, पं़स़ सदस्य व २० सरपंच राजकारण करून गैरहजर होते़ याविरूद्ध नागरिकांनी निषेधाचा ठराव घेतला़ मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले़ गत सभेतील बहुतांश प्रश्न मार्गी लागले; पण चुकीची उत्तरे लिहून असल्याने फजिती झाली़
अंतोरा ग्रा़पं़ च्या स्मशानभूमीचा प्रश्न वनविभागामुळे प्रलंबित असल्याचे सरपंच शालिनी कोडापे यांनी सांगितले़ प्राथमिक शाळेची इमारत ६० वर्षे झाल्याने जीर्ण झाली़ यावर त्वरित नवीन शाळा बांधकामाचा ठराव घेण्यात आला़ बेलोरा गावात राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत फिल्टर प्लॅन्ट केला; पण नवीन ट्रान्सफार्मर दिले नाही़ यामुळे पाणी पुरवठा होऊ शकत नाही, असा प्रश्न सरपंच माधव माहोरे यांनी मांडला़ त्यावर नवीन ट्रान्सफार्मर लवकरच बसविले जाईल, असे वीज कंपनीने सांगितले़ भिष्णूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची गैरसोय होते, हे सरपंच अर्चना घावट यांनी लक्षात आणून दिले़ यावर नवीन डॉक्टर भरतीबाबतची समस्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत मार्गी लावणार असल्याचे अमर काळे यांनी सांगितले़ चिस्तुर येथे वीज खांबामुळे जीवाला धोका असून तो हटविणे व नवीन ट्रान्सफार्मर बसविण्याची मागणी सरपंच देवानंद शेळकी यांनी केली़ श्रावणबाळच्या लाभार्थ्यांना मदत मिळाली नाही़ यावर त्वरित कारवाईच्या सूचना दिल्या़ बेलोरा खुर्द ग्रा़पं़ अंतर्गत लाभार्थ्यांना बीपीएलमध्ये समाविष्ट करून घरकूल देण्याची मागणी उपसरपंच राठी यांनी केली़ यावर सध्या २००२-०७ ची यादी सुरू असून नवीन सर्वेक्षणानंतर समावेश केला जाईल, असे सांगितले़ धाडी गावात कर्मवीर दादासाहेब स्वाभिमान योजनेंतर्गत १० लोकांना ५ वर्षांपूर्वी समाजकल्याण विभागाने जमीन वाटप केल्याचे उपसरपंच इश्वर गाडगे यांनी सांगितले; पण अद्याप मोजणी करून दिली नाही़ यावर तहसीलदारांनी मोजणीसाठी भूमी अभिलेखला प्रस्ताव पाठविणार असल्याचे सांगितले़ इंदिरा घरकूल योजनेच्या धर्तीवर रमाई घरकूलच्या लाभार्थ्यांना लाभ देण्याची मागणी केली़ यावर सदर प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे आ़ काळे यांनी सांगितले़ वडाळा गावातील शौचालय बांधकाम, वळाडा-येनाडा रस्ता, पाणी पुरवठा यावर चर्चा झाली. माजी सरपंच रामकृष्ण वडरकर यांनी कारवाईची मागणी केली़ पंतप्रधान पॅकेजच्या विहिरींना अद्याप वीज जोडणी नाही. यावर सर्वच शेतकरी संतप्त झाले. धडक सिंचन विहिरींचे बांधकाम अर्धवट असून त्वरित अनुदान देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यावर ठराव घेण्यात आला.
तळेगाव येथे नळ जोडण्या कापून नवीन मिटर लावले. यात कामासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता समिती नेमली; पण दुसऱ्याच बोगस नावाने स्थापन समिती काम करीत आहे. यावर वादळी चर्चा होऊन कारवाईचा ठराव घेण्यात आला. मनरेगामध्ये कार्यरत मजुरांचे मस्टर तहसील कार्यालयाने काढले नाही. यामुळे मजुरी मिळाली नाही, असा प्रश्न मजुरांनी मांडला. यावर कारवाईचा ठराव घेण्यात आला.
आमसभेचे प्रास्ताविक बीडीओ सी़टी़ येवला यांनी केले़ संचालन संतोष डंभारे यांनी केले तर आभार कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब विरूळकर यांनी मानले. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी अनुपस्थित पदाधिकाऱ्यांमुळे विकास कामांना खीळ बसते, मतदारांचा विश्वासघात होतो, असे आ़ अमर काळे यांनी सांगितले़(प्रतिनिधी)

Web Title: Education, Health and Family Welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.