कमाईत वर्धेची एसटी विभागात अव्वल
By Admin | Updated: May 16, 2016 02:14 IST2016-05-16T02:14:27+5:302016-05-16T02:14:27+5:30
प्रवाश्यांच्या सेवेसाठी हे ब्रीद वापरत राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने सेवा देण्यात येत आहे. एसटीचे जाळे गावखेड्यापर्यंत पोहोचले आहे.

कमाईत वर्धेची एसटी विभागात अव्वल
प्रतिदिन २७ लाखांचे उत्पन्न : ३०० बसगाड्यांतून एक लाख किमीचा प्रवास
रूपेश खैरी वर्धा
प्रवाश्यांच्या सेवेसाठी हे ब्रीद वापरत राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने सेवा देण्यात येत आहे. एसटीचे जाळे गावखेड्यापर्यंत पोहोचले आहे. या जाळ्यातून झालेल्या प्रवासात यंदाच्या आर्थिक वर्षात विदर्भातील नागपूर विभागातून वर्धा अव्वल तर विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्धेने या आर्थिक वर्षात ४ कोटी ७० लाख १४ हजार रुपयांची कमाई केली. असे असले तरी वर्धेतून भंगार बसगाड्यातूनच प्रवासी सेवा देण्यात येत आहे.
२०१४-१५ या आर्थिक वर्षात वर्धा आगाराला सुमारे १ कोटी ७६ लाख रुपयांनी तोटा आला होता. ते नुकसान भरून यंदाच्या आर्थिक वर्षांत या आगाराने ४.७० कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. एवढेच नाही तर असलेल्या सुविधांचा वापर करून नफा कमविणारा वर्धा जिल्हा नागपूर विभागात पहिला व विदर्भात दुसरा ठरला आहे. वर्धा जिल्ह्यात आजच्या घडीला ३३० बसगाड्या आहेत. यातील ३०० गाड्या एका दिवसाला १ लाख किलोमिटरचे अंतर कापत आहे. या अंतरातून दिवसाकाठी २७ लाख रुपयांचा नफा होत असल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. विदर्भात पहिल्या क्रमांकावर अमरावती विभागातून बुलडाणा जिल्हा आहे. अमरावती विभागातील बुलडाणा जिल्हा वगळता अकोला, यवतमाळ अमरावती या आगारांना नुकसान सहन करावे लागले आहे. नागपूर विभागातील भंडारा-गोंदिया, गडचिरोली या आगारांना नफा झाला; मात्र तो वर्धेपेक्षा कमीच आहे. तर नागपूर आणि चंद्रपूर आगार यंदाच्या आर्थिक वर्षात तोट्यात आल्याचे दिसून आले आहे. या आगारांकडे मार्च २०१५ ते एप्रिल २०१६ या काळात प्रवाश्यांनी पाठ दाखविल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी नागपूर विभागच नाही तर संपूर्ण राज्यात एसटीच्या भंगार गाड्यांतूनच प्रवाश्यांना सेवा देण्यात येत असल्याचे वास्तव आहे.