जिल्हाधिकारी कार्यालयात आता ई-टपाल सेवा
By Admin | Updated: October 7, 2016 02:17 IST2016-10-07T02:17:20+5:302016-10-07T02:17:20+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना तात्काळ सेवा मिळावी म्हणून अनेक सेवा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आॅनलाईन देणे सुरू केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आता ई-टपाल सेवा
एका क्लिकवर तक्रारींचा गोषवारा : जुलै २०१६ पासून संगणकीय प्रणालीचा वापर
वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना तात्काळ सेवा मिळावी म्हणून अनेक सेवा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आॅनलाईन देणे सुरू केले आहे. यात आणखी एक टप्पा गाठत जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-टपाल सेवा’ही आता सुरू करण्यात आली आहे. कार्यालयात प्राप्त होणारी सर्व पत्र, अर्जाची नोंद संगणकावर घेण्यात येत असून त्यांची तात्काळ माहिती मॅसेजद्वारे (एसएमएस) संबंधित व्यक्तीला देण्यात येत आहे.
सामान्य जनतेला लागणाऱ्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचे कार्यालय म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय होय. जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयाशी समन्वय साधून जिल्ह्यातील विकास कामे आणि जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रामुख्याने काम करते. जिल्हाधिकारी कार्यालयात शासन, जनता आणि अन्य कार्यालयाकडून दिवसभरात साधारण ४०० ते ५०० एवढ्या मोठ्या प्रमाणात टपाल येते. टपालाची नोंद यापूर्वी नोंदवहीत हस्तलिखीतपणे करण्यात येत होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात लिखाणाचे कामकाज करावे लागत होते. शिवाय यासाठी नोंद वह्या आणि कागदाचा वापर अधिक होत असल्याने त्यांचे जनत करणे कठीण काम होते. या बाबींचा विचार करून जिल्हाधिकारी नवाल यांनी ‘ई-टपाल’ संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
टपाल प्रणालीसाठी कागद व नोंदवह्यांचा वापर पूर्णपणे बंद केल्याने कागदाची बचत होत आहे. पेपरलेस टपाल नोंदणीमुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्यासह नागरिकांना त्यांच्या अर्ज नोंदीचा तपशील एसएमएसद्वारे मिळत असल्याने नागरिकांचा विश्वास बसत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-टपाल हे लोकाभिमुख प्रशासन व पेपरलेस आॅफिससाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. नागरिकांनी अर्ज वा निवेदनासोबत मोबाईल क्रमांकही द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
अर्ज, निवेदनावरील कार्यवाईचीही संदेशाद्वारे माहिती
ई-टपाल सेवेसाठी एसओबीए.सीओ.आयएन/वर्धा हे संकेतस्थळ दिले असून जुलै २०१६ पासून सेवा सुरू झाली आहे. टपालामध्ये प्राप्त होणारी सर्व पत्रे, अर्ज, निवेदन यांची नोंद संगणकावर घेण्यात येत आहे. कार्यालयात सादर करण्यात आलेल्या अर्जाची नोंद संगणकावर घेताना संबंधित अर्जावर अर्जदाराचा मोबाईल क्रमांक असल्यास त्यांची नोंद घेण्यात येते. नोंद झाल्याबद्दल अर्जदारांच्या भ्रमध्वनीवर संदेश जातो. त्या संदेशामध्ये अर्जाचा आवक क्रमांक आणि दिनांक नमूद केलेला असतो. सदर पत्र संबंधित शाखेकडे आॅनलाईन पाठविले जाते. संबंधित शाखेने अर्ज स्वीकारल्यावर पुन्हा एकदा अर्जदाराच्या भ्रमध्वनीवर संदेश पाठविला जातो. अर्जदाराच्या अर्जावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहितीही संदेशाद्वारे त्याला प्राप्त होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक शाखेला प्राप्त होणारे टपाल आणि निकाली काढण्यात आलेले टपाल यांचा गोषवारा जिल्हाधिकाऱ्यांना एका क्लिकवर पाहता येतो.