जिल्हा परिषदेच्या १३० शाळांमध्ये ‘ई लर्निंग’
By Admin | Updated: August 8, 2014 00:07 IST2014-08-08T00:07:23+5:302014-08-08T00:07:23+5:30
खासगी शाळांत असलेल्या सुविधांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळा कमी पडत होत्या. यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदांच्या शाळेतही शिक्षणाशी संबंधित असलेल्या अत्याधुनिक सुविधा देण्यात

जिल्हा परिषदेच्या १३० शाळांमध्ये ‘ई लर्निंग’
वर्धा : खासगी शाळांत असलेल्या सुविधांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळा कमी पडत होत्या. यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदांच्या शाळेतही शिक्षणाशी संबंधित असलेल्या अत्याधुनिक सुविधा देण्यात येत आहे. वर्धेत एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या चार तालुक्यातील १३० शाळात ‘ई लर्निंग’ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा गुरुवारी वर्धा पंचायत समितीच्या सभागृहात शुभारंभ करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या आठही तालुक्यात एकूण ९३४ शाळा आहेत. यात पहिल्या टप्प्यात १३० शाळांत हा प्रकल्प सुरू करण्यात आला. यात वर्धा, हिंगणघाट, सेलू व देवळी येथील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांचा समावेश आहे. यातही दोन भाग करण्यात आले आहेत. ज्या शाळांची पटसंख्या शंभरपेक्षा कमी आहे अशा शाळेत लॅपटॉपसह एलसीडी टिव्ही तर ज्या शाळांची पटसंख्या शंभरच्यावर आहे, अशा शाळेत लॅपटॉपसह प्रोजेक्टर देण्यात आले आहे. या प्रकल्पात निवड झाली आहे त्या शाळांतील शिक्षकांना पंचायत समितीच्या सभागृहात आज प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी काही विद्यार्थ्यांचाही समावेश होता.
कार्यक्रमाला जि. प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी, शिक्षणाधिकारी प्राथमिक धनराज तेलंग यांच्यासह संबंधीत संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. वाढत असलेल्या कान्व्हेंट संस्कृतीत जिल्हा परिषदेच्या शाळांत सुरू होत असलेल्या या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांना लाभ होवून ते शहरी मुलांच्या स्पर्धेत टिकतील, अशा प्रतिक्रीया अतिथींनी व्यक्त केल्या. शाळेतील उपकरणातील बिघाड दुरूस्तीकरिता संस्थेचा व्यक्ती राहणार आहे. तो वेळोवेळी या उपकरणाची पाहणी करतील, असे संस्थेचे उपक्रम संयोजक के.बी. वाळके यांनी सांगितले. कंपनीच्यावतीने पहिल्या टप्प्यात सांंगण्यात आलेले कार्य पूर्ण झाले आहे. येत्या दिवसात उर्वरीत शाळांचाही समावेश करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला शिक्षकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)