शिवाजी पुतळा ते कारला चौकापर्यंत धुळीचा रस्ता
By Admin | Updated: October 20, 2016 01:05 IST2016-10-20T01:05:23+5:302016-10-20T01:05:23+5:30
कारला चौकापासून आर्वी नाका ते शिवाजी चौकापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून धुळीचे साम्राज्य आहे. याचा वाहन धारकांना कमालीचा त्रास होते.

शिवाजी पुतळा ते कारला चौकापर्यंत धुळीचा रस्ता
पुलाचे बांधकाम अर्धवट : रस्त्याचे डांबरीकरण उखडले
वर्धा : कारला चौकापासून आर्वी नाका ते शिवाजी चौकापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून धुळीचे साम्राज्य आहे. याचा वाहन धारकांना कमालीचा त्रास होते. सदर रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने वाहनांची सतत ये-जा सुरू असते. अशातच जडवाहन गेल्यास धुळीचे लोट उठतात. त्यामुळे काही क्षणाकरिता दुचाकी वाहनधारकांना समोरचे दिसेनासे होते. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय रस्त्यावरील धुळीमुळे सर्दी, खोकला आणि नेत्रविकार होण्याचा धोका आहे. ही बाब आरोग्याचा दृष्टीने धोकादायक ठरत आहे. शिवाजी पुतळा ते आर्वी नाका पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण उखडले आहे. त्यामुळे गिट्टी व चुरी बाहेर पडली आहे. यावरून वाहन घसरण्याचा धोका असतो. या मार्गावर शिकवणी वर्ग, शाळा असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी अधिक असते. अग्रगामी शाळेजवळील बांधकाम अद्याप पूर्ण झाले नाही. एका बाजुचे काम पूर्ण झाले. डांबर टाकले नसल्याने पुलावरून वादळ गेल्यावर धुळीचे लोळ उठतात.(कार्यालय प्रतिनिधी)
पुलाचे अर्धवट बांधकाम
अग्रगामी शाळेजवळील नाल्यावर पुलाचे बांधकाम मागील वर्षीपासून सुरू झालेले आहे. अद्याप पुलाचे बांधकाम पूर्ण व्हायचे आहे. या करिता रस्ता खोदल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहे. रस्त्यावर खड्डे तयार झाल्याने यातून वादळ गेल्यास धुळ उडते. दुचाकीचालकांना याचा सर्वाधिक त्रास होतो. पुलाचे एका बाजुचे बांधकाम झाले तरी त्यावर डांबरीकरण केलेले नाही. त्यामुळे या पुलावरून जडवाहन गेल्यास रस्त्यावर धुळ उडते. ही बाब अपघातास कारण ठरत आहे. या मार्गाने वाहन चालविताना डोळ्यात जाणाऱ्या धुळीमुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.