अनामत भरली, वीज जोडणी बेपत्ताच

By Admin | Updated: January 23, 2015 01:55 IST2015-01-23T01:55:44+5:302015-01-23T01:55:44+5:30

शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वर्धा जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे़ यामुळे दुष्काळ जाहीर करण्यात आला़ शिवाय जिल्ह्यात सातत्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत; ...

Dump full, power connection disappears | अनामत भरली, वीज जोडणी बेपत्ताच

अनामत भरली, वीज जोडणी बेपत्ताच

वर्धा : शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वर्धा जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे़ यामुळे दुष्काळ जाहीर करण्यात आला़ शिवाय जिल्ह्यात सातत्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत; पण त्यांच्या मूळ समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे़ जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना अनामत रक्कम अदा करूनही वीज जोडणी देण्यात आली नाही़ यामुळे शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न भंग पावले आहे़
वर्धा जिल्ह्यात २०११-१२ पासून सुमारे ६ हजार शेतकऱ्यांनी ओलित करण्यासाठी वीज वितरण कंपनीला हजारो रुपयांची अनामत रक्कम अदा केली़ शिवाय रितसर अर्ज व कागदपत्रेही सादर करीत शेतातील विहिरीवर वीज जोडणीची मागणी केली; पण चार वर्षांपासून शेतकऱ्यांना जोडणी देण्यात आली नाही़ शेतकऱ्यांनी कर्ज काढून विहिरी बांधल्या; पण वीज पुरवठा देण्यात आला नाही़ यामुळे त्या विहिरी केवळ शोभेच्या ठरल्यात़ या सहा हजार वीज जोडणीला शासनाने मंजुरी दिली आहे़ शिवाय त्यासाठी लागणारा संपूर्ण निधी वीज वितरण कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे़ शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळावी म्हणून कंत्राटदारही नेमण्यात आले; पण महावितरणचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे गत चार वर्षांपासून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची वीज जोडणी मिळू शकली नाही़ यामुळे शेतकऱ्यांचे ओलिताची शेती करून कर्ज फेडण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे़
याबाबत महात्मा फुले समता परिषदेने जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली़ निवेदनात किमान दुष्काळी वर्षात तरी शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय्य हक्काची शेतातील विहिरीवर वीज जोडणी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली़ निवेदन सादर करताना महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा़ दिवाकर गमे, जिल्हा संगटक विनय डहाके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)

 

Web Title: Dump full, power connection disappears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.