जलयुक्त शिवारमुळे पडिक शेती होणार हिरवी
By Admin | Updated: March 28, 2017 01:08 IST2017-03-28T01:08:29+5:302017-03-28T01:08:29+5:30
उमरगाव येथील शेतकऱ्यांची बहुतांश शेती पंचधारा नदीच्या काठावर आहे. पावसाळ्यात नदीला पूर येऊन शेतातून पाणी वाहून जात शेतकऱ्यांच्या पिकांची धुळधान होत होती.

जलयुक्त शिवारमुळे पडिक शेती होणार हिरवी
पुराचा धोका टळणार : उमरगाव येथील शेतकऱ्यांना दिलासा
झडशी : उमरगाव येथील शेतकऱ्यांची बहुतांश शेती पंचधारा नदीच्या काठावर आहे. पावसाळ्यात नदीला पूर येऊन शेतातून पाणी वाहून जात शेतकऱ्यांच्या पिकांची धुळधान होत होती. परिणामी, शेतकरी शेती पडिक ठेवत होते. जलयुक्त शिवार अभियानात या नदीचे खोलीकरण तथा बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. यामुळे ही शेती वहिवाटीखाली येणार आहे.
उमरगाव परिसरातील पंचधारा नदी काठावरील बहुतांश शेतकऱ्यांचे शेती पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे पडिक राहत होती. याबाबत संबंधित विभागाकडे लेखी अर्ज दिले. तक्रारी करण्यात आल्या; पण कारवाई झाली नाही. यामुळे दोन वर्षांपासून शेती पडिक होती. यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. कुणाल जयस्वाल यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत सर्व शेतकऱ्याचे एकत्रित अर्ज जि.प. लघुसिंचन विभाग यांना सादर केले. पंचधारा नदीवर साठवण बंधाऱ्याची मागणी केली.
गतवर्षी शिवारफेरीमध्ये सरपंच यांनीही जलयुक्त शिवार योजनेतून कामांची शिफारस केली. यावरून नदीच्या रूंदीकरणासह खोलीकरण करण्यात आले. शिवाय बांधबंधिस्ती केली. यामुळे पावसाळ्यातील पुराचा धोका टळला आहे. यंदा शेतकऱ्यांना शेतीची वहिवाट करता येणार आहे. यातील २०० ते ३०० मिटरचे काम अर्धवट राहिले असून ते काम पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.(वार्ताहर)