विजतारांमुळे चार एकरांतील ऊसाचा कोळसा
By Admin | Updated: November 20, 2015 02:34 IST2015-11-20T02:34:16+5:302015-11-20T02:34:16+5:30
शेतातील ऊसाच्या पिकावरून गेलेल्या वीजवहन करणाऱ्या तारांत घर्षण होत तार तुटून खाली पडल्याने चार एकरांतील ऊस जळून खाक झाला.

विजतारांमुळे चार एकरांतील ऊसाचा कोळसा
शेतकऱ्याचे चार लाखांचे नुकसान
सिंदी (रेल्वे): शेतातील ऊसाच्या पिकावरून गेलेल्या वीजवहन करणाऱ्या तारांत घर्षण होत तार तुटून खाली पडल्याने चार एकरांतील ऊस जळून खाक झाला. ही घटना सिंदी (रेल्वे) शिवारात घडली. यात शेतकरी संजय गोविंद तळवेकर यांचे चार लाख रुपयांच्या नुकसानीचा अंदाज आहे.
संजय तळवेकर यांनी गावातील उमरेडकर यांच्या मालकीचे शेत भाड्याने केले होते. या शेतात त्यांनी ऊसाची लागवड केली होती. ऊसाचे पीक उत्तम आले होेते. या पिकावरून विजवहन करणाऱ्या तारा गेल्या आहेत. या तारांत घर्षण झाल्याने त्यातील एक तार तुटून ऊसाच्या पिकावर पडली. शिवाय तारांतील घर्षणातून आगीच्या ठिणग्याही पडल्या. त्यामुळे शेतातील उभ्या ऊसाच्या पिकाने पेट घेतला. पाहता- पाहताच संपूर्ण ऊस आगीच्या कवेत आला. यात ऊसाचा कोळसा झाला. याशिवाय शेतात ठेवून असलेले स्प्रिंक्लरचे ३० पाइपही जळाले.
शेतकरी संजय तळवेकर यांच्या उदरनिर्वाहाचे साधन शेतीच आहे. ऊस जळाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी नांदुरकर तसेच विजवितरणचे कनिष्ठ अभियंता बन्सोड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या शेतकऱ्याने शासकीय मदतीची मागणी केली आहे.(प्रतिनिधी)