अवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे तालुक्यात काळोख
By Admin | Updated: June 22, 2015 01:54 IST2015-06-22T01:54:11+5:302015-06-22T01:54:11+5:30
एक आठवड्यापासून शहरात सतत विजेचा लपंडाव होत असल्याने तालुका काळोखात गडप झाल्याचे चित्र आहे.

अवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे तालुक्यात काळोख
कारंजा (घा.) : एक आठवड्यापासून शहरात सतत विजेचा लपंडाव होत असल्याने तालुका काळोखात गडप झाल्याचे चित्र आहे. ३३ केव्हीचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने २४-२४ तास तालुका अंधारात असतो. वीज कंपनीचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असून कारवाईची मागणी होत आहे.
तालुक्यातील नारा, सावळी, कारंजा, कन्नमवारग्राम, ठाणेगाव, जुनापाणी आदी फिडर अंतर्गत येत असलेला वीज पुरवठा ३३ केव्ही मुख्य लाईनमध्ये वारंवार बिघाड येतो. यामुळे तालुक्यातील वीज पुरवठा सतत खंडित होतो. चार-पाच तास विद्युत सुरळीत झाली की लगेच बे्रकडाऊन होते. यामुळे तालुक्यातील नागरिकांना मुसळधार पाऊस व काळोख यात खितपत राहावे लागते. दैनंदिन विजेच्या वापरावर असलेल्या कामांतही व्यत्यय निर्माण होत आहे. अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने कित्येक तास वीज खंडित राहते. याबाबत नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्यास उलट उत्तरे दिली जातात. मुकेश टुले या व्यक्तीस याचा अनुभव आला. ३३ केव्हीचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यास बे्रकडाऊनवर काम करणारे अभियंता व कर्मचाऱ्यांनी नेमका बिद्याड शोधणे गरजेचे असते; पण अभियंता व कर्मचारीही मुख्यालयी राहत नसल्याने एका तासाच्या कामासाठी रात्रभर वीज पुरवठा बंद असतो. यामुळे नागरिकांना काळोखात चाचपडावे लागते.
शनिवारी रात्री ९ वाजता वीज पुरवठा खंडित झाला तो दुपारी १ वाजता सुरू झाला. अधिकारी जागेवर असते तर रात्री दोनच तासात वीज पुरवठा सुरळीत होऊ शकला असता; पण कुणीही नसल्याने तालुक्यातील नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. हा प्रकार नित्याचाच झाला आहे. यात वीज कंपनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे प्रमाणपत्र प्रकरणांची कामेही रखडल्याचे चित्र आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत तालुक्यातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)