२.६१ लाख शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान्य

By Admin | Updated: August 14, 2015 02:20 IST2015-08-14T02:20:00+5:302015-08-14T02:20:00+5:30

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट न झालेल्या जिल्ह्यातील ५१ हजार ५३७ केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना ....

Due to subsidy rate of 2.61 lakh farmers | २.६१ लाख शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान्य

२.६१ लाख शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान्य

दोन रुपये गहू व तीन रुपये किलो तांदूळ : केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्य
वर्धा : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट न झालेल्या जिल्ह्यातील ५१ हजार ५३७ केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने प्रतिमहा प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्याचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. २ लक्ष ६१ हजार २६५ पात्र लाभार्थ्यांना आॅगस्ट महिन्यापासून लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी गुरुवारी दिली आहे.
अनियमित पावसामुळे अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसोबतच हवालदिल होऊन शेतकरी आत्महत्या होण्याच्या घटना होऊ नयेत, यादृष्टीने राज्यातील १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धरतीवर सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये शेतकरी लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती ५ किलो गहू व तांदूळ देण्यात येणार आहे. दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो दराने तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे.
सवलतीच्या दरामध्ये शेतकऱ्यांना अन्नधान्य ही योजना शेती व्यवसायांवर अवलंबून असणाऱ्या केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी राबविण्यात येत आहे. तालुकास्तरावर निवड करण्यात आलेल्या लाभाधारक शेतकऱ्यांची यादी तहसील व तलाठी कार्यालय, तसेच रास्त भाव दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. या योजनेत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक तसेच त्यांच्या शेतजमिनीचा सातबारा रास्त भाव दुकानदाराकडे घोषणापत्रासह उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या योजनेच्या लाभासंदर्भात शिधापत्रिकांवर विशेष नोंद राहणार आहे. या योजनेंतर्गत आॅगस्ट महिन्यापासूनच धान्य उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे कळविले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Due to subsidy rate of 2.61 lakh farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.