फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचे आजार बळावले
By Admin | Updated: October 28, 2014 23:02 IST2014-10-28T23:02:50+5:302014-10-28T23:02:50+5:30
जिल्ह्यात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी जनजागृती अभियान राबवूनही दिवाळसण मोठ्या प्रमाणात फटाके फोडून साजरा करण्यात आला. शहरामध्ये हे प्रमाण जास्त होते.

फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचे आजार बळावले
वर्धा : जिल्ह्यात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी जनजागृती अभियान राबवूनही दिवाळसण मोठ्या प्रमाणात फटाके फोडून साजरा करण्यात आला. शहरामध्ये हे प्रमाण जास्त होते. दिवाळीनंतरही फटाके फोडणे सातत्याने सुरू असल्याने वृद्ध, मुले यांना श्वसनसंस्थेचे आजार बळावले आहे. ढगाळ वातावरण व रिमझिम पावसाने श्वसनाचा त्रास अधिकच बळावला आहे. अस्थमाच्या रूग्णांना तर कमालीचा त्रास जाणवू लागला आहे. फटाक्यांच्या धुरामुळे हवेतील प्रदूषणात वाढ झाल्याने हा त्रास होत असल्याने तज्ज्ञ सांगत आहे.
फटाक्याच्या धुराने ब्रांकायटीस, जीव गुदमरणे, अस्थमा, दम लागणे अशाप्रकारे आजार वाढण्याची शक्यता असते. घशामध्ये इन्फेक्शन झालेल्या रूग्णांची संख्या अधिक आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात झालेल्या आतषबाजीतून निघालेल्या धुराने सल्फर डायआॅक्साईड, कार्बन मोनाक्साईड आणि फॉस्फरसचे प्रमाण वाढले आहे. फटाक्यांमधून निघालेल्या धुरातून विविध घातक रसायन निघत असून, त्यामुळे हवेतील प्रदूषणात वाढ झाली आहे. याचा त्रास लहान मुले व वृद्धांना अधिक होत आहे.
फटाक्यातील प्रदूषित धुरामुळे ब्रांकायटीस, रायनाटीस, फॅटिंगजायटी यासारखे आजार वाढले आहे. या धुराने दम लागणे, छातीत टोचणे, घशात सुज येणे, सर्दी आणि शिंका येणे, जीव घाबरणे, अॅलर्जिक खोकला, छातीत खरखर होणे आणि अस्थमा यासारखे विकार होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
लहान मुलांच्या श्वसननलिका अत्यंत नाजूक असल्याने त्यांना या घातक धुराने धोका आहे, कायमस्वरूपी श्वसनाचा आजार जडण्याची शक्यताही अधिक आहे. यासोबतच अस्थमाचा त्रास असलेल्यांना फटाक्यांच्या धुरामुळे अस्थम्याचा अटॅक येण्याची दाट शक्यता असते.
फटाक्यातील धूर दाट वस्तीत जास्त प्रमाणात होत असल्याने व शहरात मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात येत असल्यामुळे या आजारांच्या रूग्णांचे प्रमाण शहरात अधिक आहे.
लहान मुले व वृद्धांना हा त्रास जास्त प्रमाणात असून, अस्थम्याचा अटॅक येणारे रूग्णही दिवाळी उत्सवामध्ये वाढत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
फटाक्यांची आतषबाजी केल्याने यामधील धुरात ५ ते १० मायक्रॉनचे दूषित कण श्वसननलिकेत खोलपर्यंत जातात. त्यामुळे श्वसननलिकेला धोका निर्माण होत असून श्वसननलिकेवर सूज येणे, घशामध्ये खाजवणे या प्रकारचे त्रास होतात.
फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे प्रचंड प्रदूषण होत असून, त्यामुळे श्वसनाचे, हृदयाचे विकार वाढतात. यावर उपाय म्हणून नागरिकांनी फटाक्यांचा धूर नाका-तोंडात जाणार नाही., याची दक्षता घ्यावी. तसेच फटाके फोडणेच टाळावे, असे आवाहन डॉक्टरांकडून व पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.(शहर प्रतिनिधी)