रेती वाहतुकीमुळे मांडगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
By Admin | Updated: February 10, 2017 01:32 IST2017-02-10T01:32:44+5:302017-02-10T01:32:44+5:30
तालुक्यातील खुणी घाटापासून मांडगावकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे.

रेती वाहतुकीमुळे मांडगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
गिट्टीही उखडली : वाहनचालकांसह ग्रामस्थ त्रस्त
समुद्रपूर : तालुक्यातील खुणी घाटापासून मांडगावकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहे. येथून रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे रस्त्याची गिट्टी उघडी पडली आहे. परिणामी, वाहनचालकांसह ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
येथील नागरिकांची समस्या लक्षात घेता योग्य कार्यवाहीची मागणी होत आहे. खुणी घाटापासून मांडगाव पर्यंतचे २ कि.मी.चे अंतर आहे. या मार्गाने जडवाहनांची वर्दळ पाहायला मिळते. क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरलेले मालवाहू वाहने येथून दररोज ये-जा करतात. ही वाहने भरधाव असल्याने अपघाताचा धोका आहे. या मार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहे. यात दुचाकी व अन्य वाहने अडखळतात. रस्त्याची गिट्टी उखडली आहे. त्यामुळे वाहने घसरतता. रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे येथे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रेतीची वाहतूक करणारे ग्रामपंचायत प्रशासनालाही जुमानत नसल्याची ओरड ग्रामस्थ करतात. कारवाईची जबाबदारी ज्यांच्याकडे ते देखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याने तक्रार कुणाकडे करावी, असा प्रश्न ग्रामस्थाना पडला आहे. पोलीस प्रशासन, महसूल विभाग व बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. या रस्त्याच्या डागडुजीची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)