नापिकीमुळे शेतकरी उदासीन
By Admin | Updated: December 21, 2014 23:05 IST2014-12-21T23:05:15+5:302014-12-21T23:05:15+5:30
निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम हातचा गेला. सोयाबीन व कपाशीचे उत्पन्न नाहीच्या बरोबर असताना तुरीचे पीक होण्याची शाश्वती नाही. रबी हंगामातील गहू, चणा या पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली.

नापिकीमुळे शेतकरी उदासीन
वर्धा : निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम हातचा गेला. सोयाबीन व कपाशीचे उत्पन्न नाहीच्या बरोबर असताना तुरीचे पीक होण्याची शाश्वती नाही. रबी हंगामातील गहू, चणा या पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्या पिकांचा श्वापदे फडशा पाडू लागली आहेत. त्यामुळे नापिकीमुळे थंडी वाढत असतानाही गावखेड्यात उदासिनतेचे वातावरण आहे.
गावखेड्यांमध्ये सप्टेंबर महिन्यापासून सुगीच्या दिवसाला प्रारंभ होतो. पूर्वी या दिवसात ज्वारीचे कणीस चवदार व्हायचे. हळूहळू थंडीचा पारा वर चढायचा. त्यामुळे हुरडा सर्वत्र नजरेस पडायचा याच काळात कपाशीच्या झाडाला आलेली बोंडे उमलून शेतकऱ्यांचे पांढरे सोने घरी येण्याची प्रक्रियादेखील सुरू व्हायची. दसरा, दिवाळी या सणांचा आनंद आणि घरी येणारे पीक यामुळे उत्साहाचे वातावरण राहत होते. सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यात सणांची धूम व पिकाची आवक वातावरण प्रसन्न करणारी असायची. परंतु १० वर्षाअगोदरचा हा काळ आता दिसत नाही. बीटी बियाण्याची पेरणी गेल्या ५ वर्षात वाढल्याने परिस्थिती बदलली. आता सप्टेंबर, आॅक्टोबर महिना निघून जातो तरी शेतकऱ्यांच्या घरी पांढरे सोने येत नाही. गेल्या गेल्या दोन वर्षात निसर्गाने केलेला लहरीपणा शेतकऱ्यांना तारण्याऐवजी मारणारा ठरला.
मागील वर्षी ओला दुष्काळ या वर्षी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला. विलंबाने झालेल्या पेरणीमुळे सर्वच शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. आर्थिक अडचणीत असलेला बळीराजा तुटला. नंतर पावसाने मारलेल्या दडीमुळे सोयाबीन या पिकाची परिपूर्ण वाढ झाली नाही. शेवटी उत्पादनात घट झाली. सर्वच शेतकऱ्यांना एक ते दीड क्विंटल इतकेच सोयाबीनची उतारा मिळाला. अनेकांनी सोयाबीनची सवंगणी व मळणी करण्याचे टाळले. नगदीचे पीक हातून गेल्याने बळीराजा व्यथित झाला असताना कपाशीच्या पिकाचीदेखील उतारा तितकासा नाही.
एक एकर शेतीच्या लागवडीपासून कापूस वेचाईपर्यंत १२ हजार रूपये खर्च येतो. आजच्या घडीला झालेल्या एकरी ३ क्विंटल कापाचे उत्पन्न म्हणजे झालेला खर्च न निघणारे आहे. त्यामुळे बळीराजा पूर्णच खचला आहे. खरीप हंगामात हाती काहीही लागले नाही. म्हणून रब्बी हंगामावर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले. उसणवारीवर पैसे आणून गहू, चणा या पिकांची लागवड केली. पीक जेमतेम अवस्थेत असताना श्वापदांनी त्या पिकांचा फडशा पाडायला प्रारंभ केला. त्यातच थंडीचा मारा वाढल्यामुळे बाल्यावस्थेत असलेले चण्याचे पीक आता पिवळे पडू लागले. नापिकी, कर्जबाजारीपणा व वारंवार निसर्गाचा बदलणारा रंग गावखेड्यात उदासिनता निर्माण करणारा ठरला. या अधिवेशनात तरी शेतकऱ्यांना काही मिळावे अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करीत आहे. (शहर प्रतिनिधी)