तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्ण बेजार
By Admin | Updated: October 4, 2015 02:59 IST2015-10-04T02:59:27+5:302015-10-04T02:59:27+5:30
सध्या वातावरणातील उकाड्यामुळे रुग्णसंख्या बळावत आहे. यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात गर्दी वाढत आहे;

तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्ण बेजार
तीन वैद्यकीय अधिकारी ओढताहेत १०० खाटांच्या हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाचा डोलारा
भास्कर कलोडे हिंगणघाट
सध्या वातावरणातील उकाड्यामुळे रुग्णसंख्या बळावत आहे. यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात गर्दी वाढत आहे; मात्र येथे तज्ज्ञ अधिकारी नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. १०० खाटांच्या या रुग्णालयात केवळ तीन अधिकारी सेवा देत आहे. त्यांना २४ तास सेवा द्यावी लागत असल्याने त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे.
जिल्ह्यात मोठ्या तालुक्यातील या उपजिल्हा रुग्णालयात हिंगणघाटसह समुद्रपूर तालुक्यातील रुग्णसुद्धा उपचारासाठी येत आहेत. दररोजची बाह्य रुग्णसंख्या एक हजार तर आंतर रुग्ण विभागची संख्या ७० आहे. अशा स्थितीत येथे येणाऱ्या रुग्णांना सेवा देणे कठीण जात आहे. येथे अनेक महिन्यांपासून तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा अभाव आहे. यासंदर्भात नियमित मासिक सभेत अहवाल सादर करण्यात येत असल्याने वरिष्ठांना यांची जाणिव आहे. या प्रश्नावर आ. समीर कुणावार यांनी विधानसभेत प्रश्न सुद्धा मांडला होता. त्यावर डॉक्टर उपलब्ध होताच रिक्त पदे भरण्यात येईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी डॉक्टरांची आवश्यकता असल्याबाबत आतापर्यंत तीन पत्रे पाठवून व्यथा मांडली आहे; परंतु डॉक्टरांची उपलब्धी मात्र झाली नाही. महामार्गावर असलेल्या या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी आहे.