गतिरोधकाच्या उंचीमुळे वाहनचालक त्रस्त
By Admin | Updated: February 20, 2015 01:39 IST2015-02-20T01:39:01+5:302015-02-20T01:39:01+5:30
शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी गतिरोधक लावण्यात आले आहेत; पण या गतिरोधकांना मापदंडच नाही़ यामुळे वाहन चालक तसेच वृद्ध नागरिकांना त्रास सहन

गतिरोधकाच्या उंचीमुळे वाहनचालक त्रस्त
वर्धा : शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी गतिरोधक लावण्यात आले आहेत; पण या गतिरोधकांना मापदंडच नाही़ यामुळे वाहन चालक तसेच वृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़ अनेक नागरिकांच्या मागे या उंच गतिरोधकांमुळे पाठदुखीचा ससेमिरा लागला आहे़ यामुळे गतिरोधक निर्मितीमध्ये मापदंड पाळावेत, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़
कुठल्याही रस्त्यावर गतिरोधक निर्माण करताना कोणते मापदंड वापरावे, याचे कुठलेही भान ठेवले जात नाही़ हा प्रकार सध्या अनेक रस्त्यांवर असलेल्या गतिरोधकांची स्थिती पाहिल्यास लक्षात येते़ काही गतिरोधकांची उंची अधिक व सरळ असल्यामुळे गाडी थांबवून नंतरच जावे लागते़ यामुळे कंबर व पाठीच्या मणक्यांना झटका बसतो़ याचा अनुभव अनेक नागरिकांनी घेतला आहे़ यामुळे कंबर व मणक्याचे आजार वाढले आहेत़ याचा सर्वाधिक त्रास वृद्धांनाच सहन करावा लागत असून थेट वैद्यकीय उपचारांचाच आधार घ्यावा लागतो़
वर्धा शहरात तसेच शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधकांच्या नावावर वाटेल त्या उंचीचे सरळ उंचवटे तयार करण्यात आले आहेत़ गतिरोधक कुठे आहे, हे कळण्यासही वाव नाही. गतिरोधकावर पांढरे पट्टेही लावण्यात आलेले नाहीत़ रात्रीच्या वेळी तेथे प्रकाश व्यवस्थाही करण्यात आलेली नाही़ यामुळे गतिरोधक सित नसल्याने अपघात होतात़
शहरातील गजानन सायकल स्टोर्स ते श्रीनिवास कॉलनी रस्त्यावर प्रथम गतिरोधक, रत्नीबाई शाळेजवळ शाळेच्या मुख्य दाराजवळील पुलावर व जवळ, बुरड वस्ती पुलावर तसेच इतर ठिकाणी असलेले गतिरोधक त्रासदायक आहेत़ मधुबाबा देवस्थान येथील नागपूर रोडवर गतिरोधक आहे; पण प्रकाश व्यवस्था नाही़ यामुळे अपघात होतात़ केसरीमल कन्या शाळेसमोर रोडवर बसविलेले गतिरोधकही त्रासदायक होते़ यात बांधकाम विभागाने डांबर टाकल्याने थोडा त्रास कमी झाला आहे़
यामुळे शहरातील तसेच शहराबाहेरील गतिरोधकांचीही पाहणी करावी़ यातील योग्य मापदंडात असलेले गतिरोधक ठेवून उर्वरित गतिरोधक मापदंडात बसवावेत आणि नागरिकांना होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़(कार्यालय प्रतिनिधी)