कोरड्या दुष्काळाचे सावट टळले
By Admin | Updated: September 14, 2014 00:08 IST2014-09-14T00:08:08+5:302014-09-14T00:08:08+5:30
जिल्ह्यात सर्वत्र आठवडाभरापूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात घोंगावत असलेल्या कोरड्या दुष्काळाने सावट टळले आहे. सर्वत्र शिवारांमध्ये पराटी सोयाबीन लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील

कोरड्या दुष्काळाचे सावट टळले
वर्धा : जिल्ह्यात सर्वत्र आठवडाभरापूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात घोंगावत असलेल्या कोरड्या दुष्काळाने सावट टळले आहे. सर्वत्र शिवारांमध्ये पराटी सोयाबीन लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण पहावयास मिळत आहे. पण असे असतानाही काही शिवारांमध्ये मररोगही पिकांवर दिसून येत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी वातावरणात बदल झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला. अनेक पिके अळ्यांनी फस्त केली होती. तसेच पिकांना पावसाची अत्यंत आवश्यकता होती. परंतु पाऊस यायला तयार नव्हता. त्यामुळे यंदा कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागेल असे चित्र निर्माण झाले होते. पण गणरायाच्या निरोपाला वरुणराजाची दमदार हजेरी लागल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली. पावसाआभावी शेवटच्या घटका मोजत पिवळी पडत चाललेली कोरडवाहू पराटी शेवटच्या घटका मोजत होती. परंतु पावसाने वेळेवर चांगली हजेरी लावल्याने पराटी जगली. तसेच खरीप हंगामातील पिकांवर आलेल्या रोगराईचे संकट संततधार पावसाने धुवून काढले असले तरी काही ठिकाणी मररोगाचे सावट पहावयास मिळत आहे.
पाऊस येत नसल्याचे अनेक लोकांना नक्षत्राची जाणीवच संपली होती. सर्वत्रच उष्णतेचे वातावरण पसरले होत. उष्णतेची झळ ग्रामीण भागासोबतच नागरिकांनाही बसत होती. पावसाळ्यातही उन्हाचा त्रास होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. पाणी नसल्याने कपाशी तसेच इतर पिके कोमेजली होती
सोयाबीन पिकांनाही थोड्याफार पावसाची गरज होती. तूर,मिरची व इतर पिकांनाही पाणी येत नसल्याने फटका बसत होता. परंतु अनंत चतुर्दशीच्या दिवसापासून संततधार पावसाने गणेशाला निरोप देण्यासाठी जिल्ह्यात आगमन केले. त्यामुळे कोमेजलेली खरीप हंगामातील पिके ताजीतवानी दिसू लागली.
पिवळे पडलेले शेतशिवार आता हिरवेगार दिसू लागले आहे. संततधार पावसाने खरीप हंगामातील सर्वच पिकाला जीवदान दिले. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आता पावसाने अशीच साथ द्यावी आणि उत्पन्न चांगले व्हावे अशी अशा शेतकरी व्यक्त करीत आहे.(शहर प्रतिनिधी)