रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांचे हाल
By Admin | Updated: November 29, 2015 02:54 IST2015-11-29T02:54:42+5:302015-11-29T02:54:42+5:30
तालुक्यातील आदिवासी भागाचा आणि गावांचा विकास व्हावा म्हणून कोट्यवधी रुपये रस्ते व अन्य योजनांसाठी दिले जातात;

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांचे हाल
निकृष्ट कामे : कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
तळेगाव (श्या.पं.) : तालुक्यातील आदिवासी भागाचा आणि गावांचा विकास व्हावा म्हणून कोट्यवधी रुपये रस्ते व अन्य योजनांसाठी दिले जातात; पण संबंधित कंत्राटदार निकृष्ट कामे करीत असल्याने तो निधी व्यर्थ खर्च होत असल्याचे दिसते. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ग्रामीण नागरिकांचे हाल होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे आहे.
आदिवासी बहुल व ग्रामीण भागातील कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची केली जातात. यामुळेच परिसरातील बहुतांश रस्ते उखडले आहेत. रस्त्यांना जागोजागी खड्डे पडले असून घरकुलाच्या इमारतींनाही भेगा गेल्या आहेत. काही घरकूल कोसळण्याच्या मार्गावर आहे. यामुळे संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी माणगी होत आहे. आष्टी तालुक्यात अनेक गावे आहेत. या परिसरात आदिवासी, बंजारा बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. पोरगव्हाण, पंचाळा, बार्म्बडा, किन्ही मोई, पांढुर्णा, शिरकुटणी या गावांतील नागरिकांना दळणवळणाची सुविधा व्हावी तसेच गावे शहराशी जोडली जावी म्हणून रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, ठक्करबाप्पा योजना तसेच नाबार्डसह विविध योजनांतून निधी आणला गेला; पण रत्यांच्या बांधकामात कंत्राटदारांनी गैरप्रकार केल्याने अनेक रस्ते उखडले आहेत. एकाच वर्षाच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. यात कोट्यवधी रुपयांचा निधी व्यर्थ गेला. रस्ते बांधकामात अंदाज पत्रकाप्रमाणे साहित्य वापरले जात नाही. गिट्टी, डांबर दिसतच नसल्याची ओरड ग्रामस्थांतून होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराकडे शाळेत येताना सुविधा मिळावी, हा यामागचा उद्देश होता; पण मुख्य विषयालाच तिलांजली मिळाली आहे. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनांमध्येही बिघाड येत असल्याचे दिसते. याच खडतर रस्त्याने आदिवासी ग्रामस्थांना पायी यावे लागते. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांवर पायी जाण्याची वेळ येत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागाचा विकास व्हावा म्हणून कोट्यवधी रुपये केवळ रस्त्यांवर खर्चिले गेले; पण गावांचा विकास झालाच नसल्याचे चित्र आहे. रस्त्यांची मात्र दुरवस्था झाली आहे. संबंधित कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून निकृष्ट कामे केली. प्राकलनाप्रमाणे कामे होत नसल्याने अल्पावधीत दुरूस्तीची वेळ येते. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत कामांची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)