संततधार पावसामुळे पिके धोक्यात

By Admin | Updated: August 3, 2016 00:58 IST2016-08-03T00:58:25+5:302016-08-03T00:58:25+5:30

काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने पिकांची स्थिती अत्यंत नाजु झाली आहे.

Due to the continuous rains the risk of crops | संततधार पावसामुळे पिके धोक्यात

संततधार पावसामुळे पिके धोक्यात

कीड रोगांचा प्रादुर्भाव : पिकांची वाढ खुंटल्याने नुकसान होण्याची शक्यता
आर्वी : काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने पिकांची स्थिती अत्यंत नाजु झाली आहे. सततच्या पावसामुळे वाढ खुंटली असून विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तूर, सोयाबीन, कपाशी, उडीद, मुंग आदी सर्वच पिके धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
सततचा पाऊस व ढगाळी वातावरणामुळे पिकांना पुरेसा सुर्यप्रकाश मिळत नाही. यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. ढगाळी वातावरण कीड रोगांना पोषक असल्याने शेतकरी त्रस्त आहे. जुलैच्या प्रारंभीच संततधार पावसाने हजेरी लावली. यानंतर पावसाचे सातत्य कायमच आहे. यामुळे तालुक्यातील सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर आदी पिकांवर मोठ्या प्रमाणात कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी, पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शासनाने गंभीर दखल घेत कृषी व महसूल विभागाकडून नुकसानीचे सर्वेक्षण करावे, नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. यानंतर तालुक्यात जुलैमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली; पण सतत पाऊस कोसळत असल्याने व ढगाळी वातावरण असल्याने पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही. यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. सोयाबीन, कापूस, मुंग, उडीद, तूर या पिकांवर कीड रोगांचे आक्रमण झाले आहे. कृषी विभागाने सूचविलेल्या उपाययोजना करण्यासही शेतकऱ्यांना उसंत मिळत नसल्याने पिके हातची तर जाणार नाहीत ना, अशी भीती शेतकरी उपस्थित करीत आहेत. एक महिन्यापासून पाऊस सुरू असल्याने पिकांपेक्षा तण वाढले आहे. यामुळे पेरणीपेक्षा निंदणीचा खर्च अधिक करावा लागत आहे. पावसामुळे निंदण करणेही शक्य होत नसल्याने खरीप हंगाम वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पावसाने उसंत घेतल्यानंतर चांगली दिसणारी पिके आता सततच्या पावसामुळे खराब होत आहे. या परिस्थितीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना त्वरित सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.(शहर प्रतिनिधी)

तुरीचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर
रोहणा - तुरीला बऱ्यापैकी भाव मिळत असल्याने एरवी आंतरपिक म्हणून असलेल्या तूर पिकाने यंदा मुख्य पिकाची जागा घेतली आहे. विदर्भात सर्वत्र तुरीच्या पिकाचे क्षेत्र वाढले; पण तुरीची पेरणी झाल्यापासून सतत पाऊस सुरू आहे. शेतात पाणी साचल्याने तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्याचे दिसून येत आहे. दुबार, तिबार पेरणी करूनही तुरीचे पीक शेतकरी वाचवू शकले नाही. यामुळे तूर उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे.
तूर पिकाची झाडे पावसाबाबत अत्यंत संवेदनशील असतात. रोपट्याच्या अवस्थेत शेतात पाणी साचल्यास तुरीची रोपटे त्वरित जळून नष्ट होतात. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तुरीची पेरणी झाल्यापासून प्रारंभी सतत पाच दिवसांची झड कमी-अधिक प्रमाणात होती. परिणामी, नदी-नाल्यांना पूर आला नसला तरी शेतात अधिक पाणी मुरल्याने तुरीच्या रोपट्यांच्या मुळाशी दलदल निर्माण झाली. शेतातील सखल भागातील पूर्णत: तर इतर भागातील तुरीची रोपटे सडून नष्ट झाली. परिणामी, तूर पिकाचे हिरवी झालेली शेते पुन्हा काळी झाल्याचे दिसते.
तीन-चार दिवसांची उघडीप मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा तुरीची दुबार पेरणी केली. चार-पाच दिवसांनी तुरीची अंकुरलेली रोपटी जमिनीच्या वर यायला लागताच दमदार पाऊस झाला. यामुळे दुबार पेरणीदेखील वाया गेली. आता आॅगस्ट महिना लागल्याने त्या जागेवर काय पेरावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पूढील हंगामात तुरी पिकवून चांगले उत्पादन मिळवू, हे शेतकऱ्यांचे स्वप्न स्वप्नच ठरणार असल्याचे दिसते. शासनाने प्रवृत्त केल्याने व चांगल्या भावाच्या आशेने यंदा तुरीचा पेरा वाढला होता. अनेकांना इतर पिकांतील आंतरपिक म्हणून नव्हे तर संपूर्ण शेतात केवळ तुरीचीच पेरणी केली होती. तुरीचा पेरा पाहता तूर हे शेतकऱ्यांचे दुय्यम व आंतरपिक नव्हे तर मुख्य व नगदी पिक म्हणून पूढे आले; पण सततच्या पावसाने बहरण्यापूर्वीच तूर नष्ट होत आहे. यामुळे तूर उत्पादन वाढविण्याच्या शासनाच्या उदीष्टाला खीळ बसली आहे.(वार्ताहर)

 

Web Title: Due to the continuous rains the risk of crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.