पावसाच्या सातत्यामुळे शेतकऱ्यांना ५० टक्के दिलासा
By Admin | Updated: September 1, 2014 23:49 IST2014-09-01T23:49:05+5:302014-09-01T23:49:05+5:30
उशिरा का होईना तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली़ यामुळे आॅक्सीजनवर असलेली पिके आता डालेत आहेत़ या पावसामुळे तालुक्यातील ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतीसाठी

पावसाच्या सातत्यामुळे शेतकऱ्यांना ५० टक्के दिलासा
कारंजा (घा़) : उशिरा का होईना तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली़ यामुळे आॅक्सीजनवर असलेली पिके आता डालेत आहेत़ या पावसामुळे तालुक्यातील ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतीसाठी लावलेला खर्च भरून निघण्याची आशा पल्लवीत झाली आहे़
तालुक्यात ६० हजार हेक्टर एकूण जमीन असून पेरणीयोग्य जमीन ४५ हजार हेक्टर आहे़ पैकी ४२ हजार ४४५ हेक्टरमध्ये प्रत्यक्ष पेरणी झाली़ २१ हजार ११९ हेक्टरमध्ये सोयाबीन, १४ हजार ३२३ हेक्टरमध्ये कापूस, ५०८६ हेक्टरमध्ये तूर, १२५६ हेक्टरमध्ये ज्वारी, ३५५ हेक्टरमध्ये भूईमुंग तर २५० हेक्टर मध्ये उडीद, तीळ, ऊस लावण्यात आला आहे़ यावर्षी सोयाबीनच्या तुलनेत कपाशीचा पेरा वाढला आहे़ पाऊस उशीरा आला़ नंतर सुमारे २५ दिवसांची बुट्टी मारली़ यामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली़ शेतकऱ्यांजवळील होती नव्हती रक्कम बी-बियाणे, खते खरेदी करण्यात खर्च झाली़ बँकांनी वेळेवर पीक कर्ज दिले नाही़ खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागले़ काही शेतकऱ्यांना दागदागीने विकून व शेती गहाण ठेवून पेरणी करावी लागली़ पावसाच्या लहरीपणामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले़ गतवर्षीप्रमाणे यावर्षीही नापिकी व आर्थिक नुकसान होणार या विवंचनेत शेतकरी होता; पण गणपतीच्या आगमनापूर्वी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली़
आतापर्यंत तालुक्यात ४६० मिमी पावसाची नोंद आहे़ प्रारंभी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान या पावसामुळे भरून निघणार नाही़ त्या पिकांची पावसाअभावी वाढच झालेली नव्हती; पण उशिरा पेरलेल्या सोयाबीन व कापूस पिकासाठी हा पाऊस वरदान ठरलेला आहे़ एकंदरीत ५० टक्के शेतकऱ्यांना या पावसाने दिलासा दिला़ बऱ्याच शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला़ निदान लावलेला खर्च निघेल, अशी आशा पल्लवीत झाली आहे़ सहकारी बँकेचे व्यवहार बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांना जमा रक्कम काढता आली नाही़ निवडणूक तोंडावर असल्याने बँकेचे व्यवहार सुरळीत होतील, अशी अपेक्षा होती; पण अद्याप कारवाई झाल्याचे दिसते नाही़ आचार संहिता सुरू होण्यापूर्वी तरी सहकारी बँकांचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी शेतकरी तसेच खातेदारांच्यावतीने करण्यात येत आहे़(तालुका प्रतिनिधी)