बहुप्रतिक्षित रेल्वे उड्डाणपुलाच्या पूर्णत्वाचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: May 18, 2017 00:31 IST2017-05-18T00:31:54+5:302017-05-18T00:31:54+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे फाटक क्र. १४ वरील उड्डाण पुलाचे गडर टाकण्याचे काम बुधवारी पूर्णत्वास गेले.

बहुप्रतिक्षित रेल्वे उड्डाणपुलाच्या पूर्णत्वाचा मार्ग मोकळा
सात वर्षांपासून रखडले होते काम : दोन वेळा मेगा ब्लॉक जाहीर करून टाकले गडर्स
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे फाटक क्र. १४ वरील उड्डाण पुलाचे गडर टाकण्याचे काम बुधवारी पूर्णत्वास गेले. बहुप्रतिक्षित पुलाच्या निर्मितीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तत्पूर्वी १२ मे रोजी रेल्वे विभागाने मेगा ब्लॉक केला होता. एका बाजूचे ५ गडर पुलावर टाकले. यानंतर आज उर्वरित ५ गडर टाकल्याने ७ वर्षांपासून अपूर्ण असलेल्या पुलाच्या कामाला गति मिळाली आहे.
हे काम विजयवाडा येथील केव्हीआर कॉन्ट्रॅक्टर अॅण्ड इंजीनियरिग प्रा.लि.ने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे तांत्रिक व्यवस्थापक आशुतोष पिंपळे, मध्य रेल्वेचे सीनियर डीएम पवन पाटील, भावेशकुमार झा, सीनियर डीओएम प्रवीण वंजारी, कार्यकारी अभियंता पवार, सिन्हा, यांच्या उपस्थिती व मार्गदर्शनात कामगार तसेच अत्याधुनिक संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून दोन अजस्त्र के्रनच्या साह्याने यशस्वीरित्या पूर्ण केले. या अवजड लोखंडी गडर्सवर आता सिमेंट स्लॅब टाकण्यात येणार असून हे काम पूर्ण होताच पूल वाहतूकीसाठी खुला होणार आहे; पण संबंधित कंत्राटदार किती वेळेत हे काम पूर्ण करतात, यावर भवितव्य अवलंबून आहे. अर्धवट पुलामुळे जनतेला वाहतुकीचा प्रचंड त्रास होता. अनेक अपघातही या मार्गावर झाले. सामाजिक कार्यकर्ते मनोज रूपारेल यांनी हा प्रश्न उचलून धरला होत. खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, अन्य सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी सरकार दरबारी आवाज उचलल्याने अखेर रेल्वेने दोन वेळा मेगा ब्लॉक जाहीर करून पूल निर्मितीचा मार्ग मोकळा केला. हे गडर्स टाकण्याचे अभिनव काम पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दोन अजस्त्र के्रनच्या साह्याने हे अवजड गडर उंच पुलावर अलगद, अचूक टायमिंग साधत ठेवण्याचे कौशल्य व तंत्रज्ञानाची भरारी पाहून सर्व थक्क झाले. या मार्गावरील वाहतूक हिंगणघाट शहरातून वळविण्यात आली होती.