बाकळी नदी प्रदूषणाच्या विळख्यात

By Admin | Updated: February 23, 2015 01:48 IST2015-02-23T01:48:20+5:302015-02-23T01:48:20+5:30

देशात नदी स्वच्छता मोहीम तर राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे़ एकाचा उद्देश नद्यांचे पात्र स्वच्छ करून प्रदूषणापासून बचाव करण्याचा...

Due to the absence of water pollution | बाकळी नदी प्रदूषणाच्या विळख्यात

बाकळी नदी प्रदूषणाच्या विळख्यात

वर्धा : देशात नदी स्वच्छता मोहीम तर राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे़ एकाचा उद्देश नद्यांचे पात्र स्वच्छ करून प्रदूषणापासून बचाव करण्याचा तर दुसऱ्या योजनेचा उद्देश पाणीटंचाईवर कायम उपाययोजना करण्याचा आहे; पण या दोन्ही योजना अद्यापही जिल्ह्यातील नद्यांना शिवल्याच नसल्याचे दिसते़ आर्वी आणि आष्टी तालुक्यात पावसाळ्यात कहर माजविणारी बाकळी नदी अद्यापही स्वच्छतेपासून कोसोदूर आहे़ ही नदी प्रदूषणाच्या विळख्यातून कधी बाहेर निघणार, असा सवाल नांदपूर, टाकरखेड व आर्वी येथील नागरिक उपस्थित करीत आहेत़
देशस्तरावर गंगा स्वच्छता अभियान राबविले जात आहे़ या अभियानामुळे देशातील अन्य नद्याही घाण आणि प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती; पण वर्धा जिल्ह्यात नदी स्वच्छता अभियान धाम नदीलाच केवळ शिवलेच़ या अभियानात नदीचे पात्र तसूभरही स्वच्छ झाले नाही़ लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सुरू झालेले हे अभियान केवळ दिवसापूरतेच राहिले़ यानंतर कुठेही नदी स्वच्छता अभियान हा उपक्रम राबविण्यात आला नाही़ वर्धा जिल्ह्याला बोर, धाम, वर्धा, वणा, बाकळी, भदाडी, यशोदा आदी नद्यांचे सामर्थ्य लाभले आहे़ या नद्यांचे पात्रही स्वच्छ होणे गरजेचे आहे; पण याकडे कुणाचे लक्षच गेले नसल्याचे दिसून येत आहे़ बाकळी नदीला येणाऱ्या पुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होते; पण ही नदी स्वच्छ करण्याकडेही दुर्लक्ष होत आहे़ या नद्या स्वच्छ होणे गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
बाकळीच्या पात्रामध्ये काटेरी झुडपे; नदीचे अस्तित्व धोक्यात
टाकरखेड, नांदपूर, आर्वी अशी निरंतर वाहणारी बाकळी नदीच सध्या काटेरी झुडपे, घाणीचे साम्राज्य, नदीच्या काठावरील विटांच्या भट्ट्या आणि अन्य कारणांमुळे धोक्यात आली आहे़ बाकळीच्या पात्रात प्रत्येक ठिकाणी केवळ काटेरी झुडपे दिसून येतात़ यामुळे नदीचे पात्र अत्यंत निमूळते झाले आहे़ काही ठिकाणी ही नदी नसून नाला असल्याचाच भास होतो़
सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणारी, वर्षभर विहिरी, हातपंपांची पाणी पातळी टिकवून ठेवणारी आणि वेळप्रसंगी पिण्यायोग्य गोड पाणी पुरविणारी बाकळी नदी सध्या प्रदूषणाच्याच विळख्यात सापडली आहे़ नांदपूर येथे तर या नदीचे पात्र नाल्यासमच झाले आहे़ यामुळे पावसाळ्यात पूर आल्यास नागरिकांच्या घरांमध्ये, शेतांमध्ये पाणी शिरते व लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागते़ हा प्रकार गत तीन वर्षांपासून जिल्ह्यात घडत आहे़
पावसाळ्यातच आठवतात उपाययोजना
पावसाळ्यामध्ये वर्धा, बोर आणि बाकळी नदीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाला उपाययोजनांची आठवण होते़ त्याही तात्पूरत्या स्वरूपाच्याच असतात़ कुटुंबांचे स्थलांतरण व बचावासाठी प्रयत्न होत असताना नुकसानच होऊ नये म्हणून कुठलेही प्रयत्न होत नाही़ बाकळी नदीचे पात्र साफ करून खोलीकरण व रूंदीकरण केल्यास नुकसान टाळणे शक्य आहे़

Web Title: Due to the absence of water pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.